वांद्रे किल्ल्यासाठी सागरीसेतू कनेक्टरला मंजुरी; 1,722 कोटींच्या प्रकल्पामुळे मुंबईची वाहतूक होणार अधिक सुकर
Bandra Fort Connector : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत स्वातंत्र्यवीर सावरकर सागरीसेतू (कोस्टल रोड) ते वांद्रे किल्ला जोडणाऱ्या कनेक्टरला मंजुरी देण्यात आली आहे. सुमारे 1,722.40 कोटी खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे वांद्रे पश्चिम परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान होणार असून नागरिकांचा प्रवासही सुलभ होणार आहे.
दोन वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीने प्रकल्पाला हिरवा कंदील दिल्याने आता या कनेक्टरच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, मा. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार जी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत वांद्रे पश्चिम येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सागरीसेतू वांद्रे किल्ल्याशी… pic.twitter.com/0S0IVHXPhs— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 25, 2026
वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा
या कनेक्टरमुळे लिलावती रुग्णालय ते बँड स्टँड या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. वांद्रे किल्ला परिसराला स्वातंत्र्यवीर सावरकर सागरीसेतूशी थेट जोडणी मिळाल्याने पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बैठकीत वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी उपस्थित
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, भाजपा नेते आशिष शेलार, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



