झायडस कॅडिला कंपनीकडून देशातील सर्वात स्वस्त अँटिव्हायरल औषध
मुंबई : झायडस कॅडिला कंपनीकडून देशातील सर्वात स्वस्त दरातील अँटिव्हायरल औषध ‘रेमडेसिवीर’चे जेनेरिक औषध बाजारात उपलब्ध करण्यात आले आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी ‘रेमडेसिवीर’ची कमतरता भासत असल्याचे दिसून आले होते. अशात आता औषधाचा काळाबाजार रोखण्यासाठी तसेच गोरगरिबांपर्यंत हे औषध पोहोचवण्यासाठी मदत होणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
झायडस कॅडिला कंपनीकडून ‘रेमडेसिवीर’ औषधाच्या बाटलीची किंमत प्रत्येकी 2 हजार 800 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. प्रतिबॉटलमध्ये 100 एमजी औषध असेल. ‘रिमडॅक’ या ब्रँडच्या नावाखाली सरकारी तसेच खासगी रुग्णालये, इतर कोरोना रुग्णांसाठी हे औषध विक्रीसाठी उपलब्ध करवून देण्यात येणार आहे.
‘रेमडेसिवीर’ची निर्मिती सुरू करणारी झायडस ही पाचवी औषध कंपनी आहे. यापूर्वी हेट्रोरो लॅब लिमिटेड, सिपला, मायलन एनव्ही तसेच जुबिलेट लाईफ सायन्सेस लिमिटेडकडून ‘रेमडेसिवीर’ उपलब्ध करवून दिले जात होते. दरम्यान, डॉ. रेड्डीज् लॅबोरेटरीज लि. तसेच सिंजिन इंटरनॅशनल लिमिटेडसोबत करार करून भारतासह 127 देशांना औषध पुरवण्यासाठीदेखील करार केले जात आहेत.

