चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची आणि समीक्षकांची प्रशंसा मिळवलेल्या ‘खालिद के शिवाजी’ या मराठी चित्रपटाने आता ओटीटीवर एन्ट्री केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना एका निरागस मुस्लिम मुलाच्या नजरेतून मांडणारा हा आशयघन चित्रपट आता Apple TV, BookMyShow OTT आणि YouTube Movies या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. समाजातील जात, धर्म आणि भेदभावाच्या पलीकडे जाऊन मानवतेचा संदेश देणाऱ्या या चित्रपटाला देश-विदेशात विशेष दाद मिळाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा शोध घेणारी कथा
‘खालिद के शिवाजी’ या चित्रपटात खालिद नावाच्या एका मुस्लिम मुलाची कथा मांडण्यात आली आहे. शाळेत ‘अफजलखान’ म्हणून चिडवले जात असल्याने त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांची उत्तरे शोधताना तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांपर्यंत पोहोचतो आणि त्यांच्या जीवनमूल्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
दमदार कलाकारांची फौज
पी.पी. सिनेप्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटात प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, सुषमा देशपांडे, कैलास वाघमारे, स्नेहलता तागडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. खालिदची मध्यवर्ती भूमिका क्रिश मोरे याने साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राज प्रितम मोरे यांनी केले असून कथा आणि लेखन कैलास वाघमारे यांचे आहे. चित्रपटाची निर्मिती मायकल थेवर आणि सुषमा थेवर यांनी केली आहे.
जागतिक स्तरावरही मिळाली दखल
‘खालिद के शिवाजी’ या चित्रपटाची प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या Marché du Film विभागासाठी निवड झाली होती. तसेच IFFI इंडियन पॅनोरामा 2025 आणि अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील India Focus Special Screening साठीही चित्रपटाची निवड झाली होती. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची बाब ठरली.
विदर्भाच्या मातीतून उभी राहिलेली कलाकृती
अकोला, अमरावती आणि नागपूर परिसरात चित्रित झालेल्या या चित्रपटात अस्सल वऱ्हाडी भाषेचा गोडवा अनुभवायला मिळतो. स्थानिक कलाकारांचा मोठा सहभाग असल्याने विदर्भातील अनेक नवोदित कलाकारांना जागतिक व्यासपीठावर झळकण्याची संधी मिळाली आहे.
OTT वर पाहण्याची संधी
चित्रपटगृहात हा चित्रपट पाहण्याची संधी ज्यांची हुकली, त्यांच्यासाठी आता सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सामाजिक सलोखा, समानता आणि मानवतेचा संदेश देणारा ‘खालिद के शिवाजी’ हा चित्रपट आता OTTच्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.

