Health & Fitness

रुग्णालय स्वच्छता,ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रशासनाला निर्देश

पुणे:  कोरोनाबाधित रुग्णांची संख्या विचारात घेत उपचारसुविधा वाढविण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना उपचारसुविधांची कमी पडणार नाही याची काळजी घेतली जात आहे. रुग्णालयाची स्वच्छता, रुग्णालयांना ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. नागरिकांनीही मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व स्वच्छता राखून कोरोना संसर्ग रोखण्याबाबत दक्षता घ्यावी. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम यशस्वी करावी असे आवाहन उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. लोकप्रतिनिधींकडून येणाऱ्या सूचना विचारात घेवून त्यानुसार योग्य कार्यवाही करावी असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

‘कोविड व्यवस्थापना’बाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी शासन, प्रशासन व जनतेच्या सहकार्यातून कोरोना संकटावर मात करणे शक्य आहे, असा विश्वास व्यक्त केला. रुग्णालयांमध्ये स्वच्छता असावी, ऑक्सिजन, रेमडिसिव्हीर इंजेक्शन पुरवठा सुरळीत रहावा, अत्यावश्यक सुविधांची उपलब्धता कायम ठेवावी, गरजू रुग्णाला आरोग्यसुविधा वेळेत मिळाव्यात, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.

कोरोना प्रतिबंध उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही करावी. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेबाबत प्रशासनाने दक्षता घ्यावी. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेला गती देण्यासोबतच बाधित रुग्णांवर वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी नियोजन करा अशा सूचनाही अजित पवार यांनी दिल्या.विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. डॉ.सुभाष साळुंखे यांनी १४ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत पहिल्या पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार अभियान राबविण्यात येत आहे.पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे ग्रामीण क्षेत्रात राबविण्यात येणार आहे असे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button