Health & Fitnessमुंबई

सर्वंकष आरोग्य निर्देशांकामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर, आरोग्यमंत्र्यांनी केले कर्मचाऱ्यांचे कौतुक

मुंबई – नीती आयोगाने जाहीर केलेल्या सर्वंकष आरोग्य निर्देशांकामध्ये महाराष्ट्राने संपूर्ण देशात सहाव्या क्रमांकावरुन तिसरा क्रमांक मिळविला. ही निश्चितच आनंदाची बाब आहे. आरोग्य विभागातील अधिकारी – कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या कामगिरीचे हे यश असून टीम वर्कच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना निरोगी आणि दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याकरिता प्रयत्न करण्यात येतील, अशी प्रतिक्रिया आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केली. या संदर्भात अधिक माहिती देताना आरोग्य मंत्री म्हणाले, जागतिक बँक आणि केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने नीती आयोगाने 2017-18 च्या माहितीच्या आधारावर आरोग्यदायी राज्य प्रगतीशील भारत अहवाल तयार केला आहे. सर्वात मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राने 63.99 गुणांसह तिसरे स्थान मिळविले. आरोग्याच्या क्षेत्रात राज्य शासनाने वेळोवेळी घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे राज्याचा गुणात्मक दर्जा वाढला असून भविष्यात देखील मातामृत्यु, बालमृत्यु दर शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मेळघाट सारख्या दुर्गम भागातील बालमृत्यु रोखण्याकरिता मेळघाट कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यावर अंमलबजावणी सुरु असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button