यवतमाळ येथेही कोरोना लॅब सुरू; सहा तासांत अहवाल मिळणार
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना लॅब साकारण्यास शासनाने मंजुरी दिली असून कोरोना चाचणीला सुरुवातही झाली आहे. १५ मेपासून या लॅबच्या निर्मितीसाठी प्रशासनाने पाठपुरावा केला. सिंगापूरवरून आरटीपीसीआर मशीन हॉपकिन्सच्या माध्यमातून याची खरेदी करण्यात आली. मंगळवारी सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या अखत्यारीत या कोरोना लॅबचे उद्घाटन करण्यात आले. २४ तासांत १२५ नमुने तपासण्याची क्षमता या लॅबमध्ये आहे. आता कोरोनाच्या चाचणीसाठी नागपूरची गरज भासणार नाही.
वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने मागील आठ दिवसांपूर्वीच सीबीनॅट व ट्रूनॅट या मशीनच्या साहाय्याने कोरोनाची नमुना तपासणी सुरू केली होती. मात्र या मशीनवर मर्यादित म्हणजे १० ते १५ नमुने तपासता येत होते. रुग्णसंख्या व जिल्ह्याचा व्याप बघता कोरोना नमुने तपासणीसाठी स्वतंत्र कोरोना लॅब तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. नव्या प्रशासकीय इमारतीत एका प्रशस्त हॉलमध्ये ही लॅब तयार केली आहे. संपूर्ण मशनरी आल्यानंतरही त्यातील काही पार्ट ट्रान्सपोर्टींगदरम्यान डॅमेज झाले होते. त्याची प्रतिपूर्ती करून ही मशीनरी इन्स्टॉल करण्यात आली.
आरटीपीसीआर मशीनवर कोरोना संशयितांच्या स्वॅबची तपासणी होणार आहे. सिंगापूर, जर्मनी, यूएसए या देशातील तंत्रज्ञांनी विकसित केलेले हे मशीन गतिमान पद्धतीने काम करणार आहे. सॅम्पल लावल्यानंतर सहा तासांत त्याचा अहवाल प्राप्त होणार आहे. ही लॅब २४ तास सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे संशयिताच्या नमुन्याची तत्काळ तपासणी करून तो पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे माहिती होणार आहे.