कोल्हापुरात आजपासून सात दिवस कडक संचारबंदी
कोल्हापूर : कोल्हापुरात कोरोनाची वाढत असलेली संक्रमण साखळी तोडण्यासाठी रविवारच्या मध्यरात्रीपासून कडेकोट लॉकडाऊनला सुरुवात झाली. शहरातील 145 रस्ते बंद करून 40 ठिकाणी पोलिसांनी नाके उभारले आहेत. तर जिल्ह्यात 38 ठिकाणी तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत. आजपासून सुरू झालेली कडक संचारबंदी 26 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कोणालाही घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी सर्व प्रशासकीय यंत्रणा गतिमान करताच रस्त्यावरची गर्दी ओसरली आणि रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत.
वैद्यकीय उपचार, औषध दुकाने, वर्तमानपत्रांची कार्यालये व अंक विक्री तसेच अत्यावश्यक शासकीय कार्यालये वगळता जिल्ह्यातील सर्व व्यवहार आठवडाभरासाठी पूर्णपणे बंद झाले आहेत. एमआयडीसीसह ग्रामीण भागातील उद्योगांत 50 टक्के कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये दूध संकलन आणि वाहतुकीची वेळ मर्यादा उठविण्यात आली असून, बँकांची मुख्य कार्यालये मर्यादित कर्मचारी संख्येवर सुरू ठेवता येणार आहेत. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती यांचे अत्यावश्यक सेवेचे कामकाज सुरू राहणार आहे. लाकडांची सुरुवात झाल्याने जिल्ह्यात शांतता पसरली आहे. दरम्यान काल रविवारी कोल्हापुरात 154 रुग्णांची भर पडली. लोकांमध्ये कोरोनाच्या भीतीचे सावट अधिक गडद होताना दिसत आहे.