विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून राज्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भेट घेतली. शेट्टी यांचा पक्ष सध्या काँग्रेस आघाडीत आहे. या आघाडीत मनसेने सहभागी होण्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचे कळते. राज ठाकरे यांच्याबरोबरची शेट्टी यांची ही दुसरी भेट आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शेट्टी यांनी राज यांची भेट घेतली.
आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेने आघाडीत सहभागी व्हावे, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे प्रयत्न आहेत. मात्र, काँग्रेस मनसेसाठी अनुकूल नाही. मनसेनेही विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मनसेने लोकसभेची निवडणूक लढवली नव्हती. निवडणूक रिंगणाच्या बाहेर राहून राज ठाकरे यांनी शिवसेना-भाजपच्या विरोधात प्रचार केला. आता राज ठाकरे पुढे काय पाऊल उचलणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.


