पोलिसावर हात उगारणे भोवले, मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्याची शिक्षा
अमरावती : अमरावतीच्या अंबादेवी मंदिराजवळ पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आठ वर्ष जुन्या प्रकरणात ठाकूर यांना शिक्षा झाली आहे.
यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिराजवळ पोलिसाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना 24 मार्च 2012 रोजी घडली होती. पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यांचा कार चालक आणि सोबतचे दोन कार्यकर्ते देखील दोषी आढळले आहेत. फितुर होऊन साक्ष देणारा एक पोलिसही शिक्षेस पात्र ठरला आहे.
दरम्यान, यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना यशोमती ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. या निकालानंतर लगेच आम्हाला जामीनही मंजूर करण्यात आलेला आहे. या प्रकरणी आम्ही निर्दोष आहोत. त्यामुळे न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालयात जाणार आहोत, अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली.