बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा; भाजपचा इशारा
मुंबई :- कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता बेस्ट कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आपल्या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून घरी थांबावं, असं आवाहन बेस्ट वर्कर्स युनियनने केल्यानंतर आता भाजपनंही या आंदोलनात उडी घेत बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देत आंदोलनाचा इशारा दिला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हा इशारा दिला आहे. आतापर्यंत जवळपास १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच बेस्ट कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे काही मागण्या केल्या होत्या. बेस्ट कर्मचा-यांच्या जीवताच्या रक्षणाची हमी महापालिकेने घ्यायलाच हवी, त्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा मानवतेच्या भावनेतून आम्हालाही त्यांच्या आंदोलनात उतरावं लागेल” असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे या मागण्यांवरुन राजकारण सुरू झाल्याचं दिसून येत आहे.
बेस्ट @myBESTBus कर्मचाऱ्यांच्या जीविताच्या रक्षणाची हमी महापालिकेने घ्यायलाच हवी! त्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा आम्हांलाही त्यांच्या आंदोलनात मानवतेच्या भावनेतून उतरावं लागेल! #IndiaFightsCorona @CMOMaharashtra @mybmc pic.twitter.com/GXGKTrZJUl
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 16, 2020
बेस्ट कर्मचारी करोनाबाधित झाल्यावर त्याचं आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांचं विलगीकरण करण्यात यावं, प्रत्येक आगारात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असून प्रत्येक बेस्ट कामगारांची करोना चाचणी रोज करण्यात यावी, बेस्ट कर्मचाऱ्यांची ने आण करण्यासाठी राखीव व स्वतंत्र बसगाड्या सुरू कराव्यात, करोनाबाधित मात्र कोरोनाचे लक्षण नसलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात यावे आणि तेथेच त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत, करोनाच्या विरोधात लढण्यासाठी कर्तव्यावर उपस्थित असलेले आणि करोनाबाधित होऊन मृत्यूमुखी पडलेले बेस्ट, पालिका व अन्य आस्थापनातील, पोलीस कर्मचारी यांना शहीद दर्जा देऊन इतर सर्व सवलती त्यांना देण्यात याव्यात, अशा अनेक मागण्या बेस्ट उपक्रमाकडे करण्यात आल्या आहेत.


