‘लोकप्रिय मुख्यमंत्री’ हे कोणाचे सर्वेक्षण आहे मला माहिती नाही; उद्धव ठाकरेंना माझ्या शुभेच्छा – फडणवीस
मुंबई : लोकप्रिय मुख्यमंत्री हे कोणाचे सर्वेक्षण आहे मला माहिती नाही. ते मी पाहिले नाही; पण कोणाला ते लोकप्रिय वाटत असतील तर चांगलं आहे. महाराष्ट्र सरकारने कोविडसंदर्भात चांगलं काम केलं पाहिजे एवढीच सध्या अपेक्षा आहे. मुंबईतल्या लोकांना दिलासा मिळाला पाहिजे. मुंबईतल्या लोकांची आजची अवस्था अत्यंत वाईट आहे. आरोग्य सेवांसंदर्भातील एका व्हिडीओचा दाखला देत फडणवीस म्हणाले, “आपण सोशल मीडियावर जाऊन जर मुंबईची अवस्था बघितली तर कोण किती लोकप्रिय आहे हे आपल्या लक्षात येईल.
माझ्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा आहेत. ” असे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. लोकप्रिय मुख्यमंत्री यादीत पाचव्या क्रमांकावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव आल्यानंतर फडणवीस यांनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. लाईव्ह पत्रकार परिषदेत पत्रकारांनी लोकप्रिय मुख्यमंत्रीचा मुद्दा छेडल्यानंतर फडणवीस यांनी उत्तर दिले. त्याचप्रमाणे त्यांनी शिवसेनेला टोलादेखील हाणला आहे. “शिवसेना आमच्यासोबत पाच वर्षे सत्तेत होती तेव्हाही त्यांनी विरोधी पक्षाचंच काम केलं.
ते कधीच एका भूमिकेवर ठाम राहिले नाही. रोज भूमिका बदलयाची हे त्यांचं धोरण. एक दिवस म्हणायचं पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलं काम करत आहेत. काही दिवसांनी मोदींवर टीका करायची. एकदा राज्यपालांना नावं ठेवायची, नंतर कुनिर्सात करायचा. फक्त टीकेसाठी टीका करायची असं शिवसेनेचं धोरण आहे. त्या टीकेला अर्थ, तत्त्व आणि मूल्य नाही. ” असा टोला फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला.


