मुंबई : डोंगरी येथील कोळी महिलांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. डोंगरी येथील मासळी बाजारात बेकायदा मासेविक्रेत्यांनी अतिक्रमण केलं असून हे अतिक्रम हटवण्याची मागणी या महिलांनी राज ठाकरे यांच्याकडे केली.
भेटीची कोणतीही वेळ न घेता या महिला थेट कृष्णकुंजवर दाखल झाल्या. परंतु तरीदेखील राज ठाकरे त्यांना भेटण्यासाठी कृष्णकुंजबाहेर आले. यावेळी राज यांनी कोळी महिलांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यांची मागणी ऐकूण घेतली. या कोळी भगिनींची समस्या महत्त्वाची असल्याने त्या वेळ घेऊन आल्या नसल्या तरी राज यांनी त्यांची भेट घेतली. “राजसाहेब बेकायदा मासे विक्रेत्यांना हटवा, परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने आमच्या पोटावर पाय येतो आहे. आमचा व्यवसाय मंदावला आहे तुम्हीच काहीतरी मार्ग काढू शकता” अशी मागणी करत मुंबईतल्या डोंगरी भागातील कोळी भगिनींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
डोंगरी मासळी बाजाराबाहेर बेकायदा मासेविक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण सतत वाढत आहे. अतिक्रमण करणारे मासेविक्रेते हे परप्रांतीय असून ते बेकायदा मासेविक्री करत आहेत. परप्रांतीय मासे विक्रेत्यांमुळे कोळी महिलांचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे या अनधिकृत मासेविक्री करणाऱ्यांना त्या ठिकाणावरुन हटवण्यात यावे, अशी मागणी या महिलांनी राज ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी राज ठाकरे यांनी कोळी महिलांना त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
राज ठाकरे यांना नेमकं काय म्हणाल्या कोळी भगिनी?
परप्रांतीय बेकायदा फेरीवाल्यांचा वावर डोंगरी परिसरात वाढला आहे त्यांना हटवण्यात यावं
आम्ही परप्रांतीय बेकायदा व्यावसायिकांमुळे व्यवसाय करु शकत नाही, या प्रश्नी मार्ग काढावा
कोळी बाजाराच्या बाहेर अनधिकृत मासे विक्रेते आहेत त्यांच्यामुळे आमच्या पोटावर पाय येतो आहे तुम्ही या प्रकरणी तोडगा काढावा
परप्रांतीयांऐवजी महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना रोजगाराची, व्यवसायाची संधी मिळावी यासाठी राज ठाकरे कायमच आग्रही असतात. मुंबईतल्या कोळी महिलांनी राज ठाकरेंची भेट घेऊन परप्रांतीय मासे विक्रेत्यांना हटवण्याची मागणी केली आहे. राज ठाकरेंनीही या प्रकरणी लक्ष घालून योग्य मदतीचं आश्वासन दिले आहे. त्यामुळे राज ठाकरेंना भेटण्यासाठी आलेल्या कोळी महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. या आधी मुंबईचे डबेवाले, जीम मालक देखील राज ठाकरेंना भेटून गेले होते.

