कल्याण ग्रामीण मध्ये विकास कामांचा धडाका खासदार व आमदारांच्या प्रयत्नातून ४९ कोटी रुपयांच्या कामांची भूमिपूजने संपन्न
डोंबिवली – कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात एमएमआरडीए च्या माध्यमातून रस्त्याचे मजबुती करणाचे जाळे विणले जाणार असून भविष्यात मतदार संघात काँक्रिट रस्ते तयार केले जाणार आहे. कल्याण ग्रामीण भागातील तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यांच्या कामांची भूमिपूजने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व आमदार सुभाष भोईर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या प्रमुख रस्त्यांकरिता खासदार व आमदार गेली दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्यानुसार दि. २२ नोव्हेंबर २०१८ रोजी खासदार व आमदार यांच्या नावे प्रस्तावांना मान्यता देण्यात आली होती.



खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पांडुरंग वाडी ते गावदेवी रस्ता तयार करणे – ९. ७७ कोटी, मयूर हॉटेल ते तुकाराम चौक ते दावडी स्मशानभूमी रस्ता १२.६० कोटी, व्यंकटेश पेट्रोल पंप ते रिजन्सी पर्यंत रस्ता ४.२० कोटी तर आमदार सुभाष भोईर यांच्या प्रयत्नातून उत्तरशीव नारिवली रस्ता सुधारणा करणे ५.८८ कोटी, कोळे घेसर (निळजे पाडा) रस्ता सुधारणा ७.०२ कोटी व हेदुटणे ते शिरढोण रस्ता सुधारणा करणे ८.४८ कोटी रुपयांच्या कामांची भूमिपूजने संपन्न झाली. त्याचप्रमाणे आमदार सुभाष भोईर व नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांच्या प्रयत्नातून १ कोटी आणि मिलाप नगर तलाव सुशोभीकरणाकरिता नगरसेविका पूजा योगेश म्हात्रे यांच्या प्रयत्नातून २५ लक्ष रुपयांच्या कामांची भूमिपूजन करण्यात आली.
कल्याण ग्रामीण मतदार संघात एमएमआरडीएच्या माध्यमातून काँक्रीट रस्ते होणार असल्याने भविष्यात ग्रामीण भागात मजबूत रस्ते मिळणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व आमदार सुभाष भोईर यांनी सांगितले आहे. यावेळी ग्रामीण भागातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

