Festival (फेस्टिव्हल)Maharashtra Govमुंबई

गणेशोत्सव साधेपणाने साजरा करत जगासमोर नवा आदर्श निर्माण करा – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई : करोना संसर्गाचा धोका अजूनही कायम आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा नेहमीसारखा नसेल. यंदा हा उत्सव धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. राज्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून हा उत्सव साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात आज मंत्रालय येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील व शंभूराज देसाई, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर, राज्यभरातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, नेहमीप्रमाणे यंदा हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. करोनाचा धोका अजूनही कायम आहे. यंदा गर्दी करता येणार नाही, मिरवणुका काढता येणार नाहीत. करोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल. ही साधेपणाची चौकट आपणा सर्वांना ठरवावी लागेल. आपण महाराष्ट्रात पुनःश्च हरिओम करीत आहोत. प्रत्येक पाऊल हे सावधतेने टाकत आहोत. गणेशोत्सवही याच चौकटीत राहून साजरा करावा लागेल. परंपरा खंडित होणार नाही याची काळजी घेतानाच सामाजिक भान ठेवावे लागेल. संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा गणेशोत्सव आपण साजरा करू,’ असं मुख्यमंत्री म्हणाले. गणेश मंडळांनी सामाजिक जनजागृतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

दरम्यान, पुणे तसेच इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे. सरकारच्या निर्णयास पूर्णपणे पाठिंबा असल्याची ग्वाही गणेश मंडळांनी दिली आहे. शिर्डी, सिद्धिविनायक व अन्य संस्थांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मोठी मदत केली आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button