Health & Fitnessआरोग्य

जगातील सर्वांत मोठी कोरोना लसीकरण मोहीम भारतात राबवणार- पंतप्रधान मोदी

जगातील सर्वांत मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबवण्याच्या दृष्टीने भारतात तयारी सुरू असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिली. लसीकरणाची तयारी सध्या शेवटच्या टप्प्यात असून लोकांना भारतात निर्मिती झालेल्या लसीचा डोस मिळेल असंही नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

गुजरातमधील राजकोटमध्ये एम्स रुग्णालयाच्या भूमिपूजनावेळी ते बोलत होते. यावेळी मोदी म्हणाले की, देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या सध्या कमी होत आहे. आम्ही जगातील सर्वांत मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबवण्याची तयारी करत आहोत. २०२० ने आपल्याला आरोग्य हीच संपत्ती आहे हे चांगलंच शिकवलं आहे. हे वर्ष अनेक आव्हानं घेऊन आलं, असंही ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, भारत जागतिक आरोग्याचे मुख्य केंद्र म्हणून उदयास आलं आहे.

२०२१ मध्ये आपल्याला आरोग्यसेवेसाठी भारताची भूमिका बळकट करावी लागेल. कोरोनाच्या लसीबाबत देशात आवश्यक ती तयारी सुरू करण्यात आली आहे. भारतात विकसित होणारी लस ही जलदगतीनं सर्वांपर्यंत पोहचेल यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. जगातील सर्वांत मोठी लसीकरणाची मोहीम राबवण्यासाठीही तयारी केली जात आहे. ज्या प्रकारे संक्रमण थांबवण्यासाठी आपण एकत्र येऊन प्रयत्न केले तसं लसीकरणाची मोहीमही यशस्वी करण्यासाठी भारत एकत्र होऊन पुढे येईल, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसवरही निशाणा साधला. २०१४ मध्ये आपलं आरोग्य क्षेत्र वेगळ्याच दिशेला होतं. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून काम केलं जात होतं. प्राथमिक आरोग्य केंद्राचीही वेगळीच प्रणाली होती. गावात योग्य सुविधा मिळत नव्हत्या. भारताने योग्य वेळेत पावलं उचलल्यानं आज आपण चांगल्या स्थितीत आहोत. १३० कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात एक कोटी लोकांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे, असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button