मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मंत्रालयात आत्ता लागणार २ शिफ्ट!
मुंबई: मुंबईत वाढत्या कोरोनाची परिस्तिथी पाहता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध लागू केले. तसेच मंत्रालयातील कार्यालयीन वेळा आणि वर्क फ्रोम होमच्या मध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येईल याचे तत्काळ नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिली. कार्यालयीन वेळांची १० – ५ ही मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीत म्हणाले होते. अशा तर्हेने महाराष्ट्राने पुढाकार घेऊन नवीन कार्य संस्कृतीची सुरुवात करावी असेही मुख्यमंत्री बैठकीत म्हणाले.
या बैठकीत महाराष्ट्र अधिकारी महासंघाचे संस्थापाक व मुख्य सल्लागार ग. दी. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, तसेच मंत्रालय अधिकारी संघटनेचे सरचिटणीस विष्णू पाटील, मुख्य सचिव संजय कुमार, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खरे यांची देखील उपस्थिती होती. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “आपण या नव्या पद्धतीच्या कामाची सुरुवात करून पाहू ज्यामध्ये कामेपण संपूर्ण क्षमतेने आणि व्यवस्थित पार पडतील आणि कोरोनाचा धोका कमी राहील. अधिकारी महासंघाने यात पुढाकार घेऊन तसेच सर्वांना विश्वासात घेऊन दोन शिफ्टमध्ये मंत्रालयीन वेळांचे नियोजन कसे करता येईल ते पाहावे.”
कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे मंत्रालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन कर्मचारी या प्राधान्याने लसीकरण करणे याबाबत नियोजन करण्याची सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिली. तसेच मंत्रालयात दररोज येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रवेशापूर्वी तापमान पाहण्यात यावे तसेच त्यांची अँटिजेन टेस्ट करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी जेणे करून मंत्रालयात संसर्गात आलेली व आजारी व्यक्ती येणार नाही याची खात्री करता येईल. यासाठी यंत्रणा उभारण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.