स्पेनच्या दुसऱ्या मानांकित राफेल नदालचे कारकीर्दीतील २१वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचे स्वप्न बुधवारी स्टेफानोस त्सित्सिपास याने उधळून लावले. जेतेपदाचा दावेदार समजला जाणारा नदाल तसेच महिलांमध्ये अग्रमानांकित अॅश्ले बार्टी यांचे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.
सुरुवातीचे दोन सेट जिंकूनही खेळात सातत्य राखता न आल्याने नदालला पराभवाचे तोंड पाहावे लागले. नदालला ग्रीसच्या पाचव्या मानांकित त्सित्सिपास याने ६-३, ६-२, ६-७ (४), ४-६, ५-७ असे हरवले आणि ऑस्ट्रेलियन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. कारकीर्दीत नदालने २२५व्यांदा पहिले दोन सेट जिंकल्यानंतर कामगिरी खालावल्याने पराभूत होण्याची ही दुसरी वेळ ठरली. आता उपांत्य फेरीत त्सित्सिपासला अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील उपविजेता डॅनिल मेदवेदेव याच्याशी झुंजावे लागेल.
या अविश्वसनीय कमबँकची संधी सीसीपासला तिसऱ्या सेटच्या टाय ब्रेकरमध्ये तेंव्हा मिळाली जेव्हा टाय ब्रेकच्या सुरुवातीलाच नदालने त्याच्याकडून अपेक्षीत नसलेल्या तीन चुका केल्या. त्याचा पुरेपूर फायदा सीसीपासने उचलला. शेवटच्या दोन सेटमध्ये त्याने आपल्या सर्वीसवर ८४ टक्के गुण कमावले आणि २७ विनर फटकेही लगावले. त्याआधारे हार्डकोर्टवर त्याने नदालविरुध्दच्या पाच सामन्यांतील आपला पहिलाच विजय नोंदवला.
मी स्वत: ला शांत व संयमात राखण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही सामन्यात मी हे करु शकलो नव्हतो. मी ज्या पध्दतीनेे खेळलो, अक्षरश: एखाद्या पक्षासारखा मी तरंगत बाहेर पडलो त्याचा मला आनंद आहे असे सीसीपासने म्हटले आहे. गेल्यावर्षी याच स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात नदालने त्याचे सरळ सेटमध्ये आव्हान संपवले होते. तो हिशोब आज सीसीपासने चुकता केला.
नदाने येथे तिसरा सेट गमावण्याआधी ग्रँड स्लॅम स्पर्धात सलग ३५ सेट जिंकलेले होते. पण सीसीपासने ती मालिका खंडीत करताना नदालवर आठ सामन्यांतला दुसरा विजय नोंदवला. या स्पर्धेत गेल्या चार वर्षात तिसरयांदा नदाल उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला आहे.
