ShivSenaठाणे

ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांचे निधन

ठाणे : सोमवारी पावणे पाचच्या दरम्यान ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांचे एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते कोळी समाज नेते आणि माजी खासदार सुद्धा होते. त्यांचे उपचार गेले दोन महिन्यांपासून एका खासगी रुग्णालयात सुरु होते. परंतु सोमवारी सकाळी पावणे पाचच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली . त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि २ नातवंडे आहेत. मंगळवारी दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल असे माहितीनुसार समजते.

ठाणे महापालिकेत यापूर्वी महापौर पदाचा कालावधी एक वर्षांचा होता. त्या वेळेस म्हणजेच १९९३ ते १९९६ या कालावधीत अनंत तरे यांनी सलग तीनदा महापौर पद भूषविले होते. अशा प्रकारे सलग तीनदा महापौर पद भूषविणारे ते एकमेव लोकप्रतिधी आहेत. त्यांनी रायगड जिल्ह्य़ातून शिवसेनेकडून लोकसभेची दोनदा निवडणुक लढविली होती. मात्र, त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. २००० ते २००६ या कालावधीत ते विधान परिषदेचे सदस्य होते. सध्या शिवसेनेचे उपनेते आणि कोळी समाजाचे नेते म्हणून ते कार्यरत होते. तसेच ते लोणावळा येथील एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देखील होते.

माहितीनुसार कळते की, २ महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झालेली होती. त्यामुळेच ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते बरे होत असतानाच मेंदूघाताचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

ठाण्यातील निष्ठावान शिलेदार अशी ओळख असलेले माजी महापौर अनंत तरे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. अनंत तरे यांच्या निधनाने शिवसेना कुटुंबातील एक तारा आज निखळला, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.

एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा सोशल मीडियावरून आपल्या भावना आणि दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, ठाण्यातील माजी महापौर , माजी आमदार, शिवसेना उपनेते व कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचे निधन वेदनादायी आहे. ठाण्यातील शिवसेना नेते अनंत तरे यांनी शिवसेनेसाठी मोलाचे योगदान केले होते. त्यांच्या जाण्याने शिवसेनेचे न भरून येणारे नुकसान झाले असे म्हणत त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button