अर्थसंकल्पनीय अधिवेशनाआधी २५ जणांना कोरोनाची लागण!
मुंबई: विधीमंडळाचं अर्थसंकल्पनीय अधिवेशन यंदा १ ते १० मार्च असे दहा दिवस होणार असून आज सभेचा पहिला दिवस आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार समोर बऱ्याच अडचणी दिसत आहेत. तर अधिवेशनात कोरोनानी शिरकाव केल्याचे समोर येत आहे. अधिवेशन सुरु होण्या आधी २५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे कळत आहे.
अधिवेशनाच्या दोन दिवसाआधी विधानभवनात कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. एकूण ३२०० जणांच्या कोरोन चाचण्या झाल्या होत्या तर त्यातील २५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात पोलिस आणि माध्यम प्रतिनिधि असल्याचे समोर येत आहे. बहुतेक आमदारांनी खासगी कोरोना लॅब मध्ये चाचण्या केल्या होत्या असे समजते.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सरकारने अधिवेशनाआधी प्रत्येकाला कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे असे जाहीर केले होते. अधिवेशन दहा दिवस असून पहिला दिवस (१ मार्च) राज्यपालांचं अभिभाषण तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी (२ आणि ३ मार्च) राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. चौथ्या आणि पाचव्या दिवशी (४ आणि ५ मार्च) पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान होणार आहे. तर आठव्या दिवशी अर्थसंकल्प सादर होणार आहे. नवव्या दिवशी शासकीय कामकाज पार पडणार असून दहाव्या दिवशी अर्थसंकल्पावर चर्चा व त्या नंतर अधिवेशनाची सांगता होणार आहे. या दरम्यान सदस्यांना टप्प्यांनी कोरोनाची चाचणी करणे महत्वाचे आहे असे सरकारने जाहीर केले आहे.

