मुंबई : माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्या खांद्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. सानप यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी सानप यांना नियुक्तिपत्र दिलं आहे. सानप यांनी गेल्या महिन्यात २१ डिसेंबर रोजी मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजपच्या कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता .
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाच्यावतीने आपली प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करताना मला खूप आनंद होत आहे. आपण आपल्या संघटन कौशल्याने राज्यभरात पक्ष संघटन वाढविण्यासाठी अथक परिश्रम कराल, ही अपेक्षा आहे. आपल्या आगामी कार्यास माझ्या शुभेच्छा, असे चंद्रकांत पाटील सानप यांना पाठवलेल्या नियुक्तिपत्रात म्हणाले आहेत. दरम्यान सानप यांच्या प्रवेशाने आगामी नाशिक महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला फायदा होणार आहे.
