संजय राठोड यांची पोहरादेवी येथील गर्दीबाबत पहिली प्रतिक्रिया!
मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेले वनमंत्री संजय राठोड यांनी आज पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करत असल्याचे सांगितले. पोहरादेवी येथे मंगळवारी शक्तीप्रदर्शन केल्यानंतर राठोड बुधवारी सकाळी यवतमाळहून निघून नागपूर मार्गे मुंबईला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी रवाना झाले.
पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचे राठोड यांनी यवतमाळहून निघताना मिडीयाला सांगितले. मात्र ही भेट कुठे होणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नाराजगी बद्दल विचारता त्यांनी बोलण्याचे टाळले. पोहरादेवी गर्दी बाबत प्रश्न करता व आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी लोकांवर गुन्हा दाखल झाल्याबद्दल विचारले असता, पोहरादेवी येथे गर्दी करू नये असे आवाहन कले होते, तरी नागरिक स्वयंस्फुर्तीने आले असा दावा संजय राठोड यांनी केला.
वादात अडकल्यानंतर आतापर्यंत गायब असलेले वनमंत्री मंगळवारी पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमात दिसले. मुंबईला जाण्यासाठी संजय राठोड पत्नी व मेहुण्यासह यवतमाळहून नागपुरात दाखल झाले. विमानतळावर एकही पदाधिकारी व एकही शिवसैनिक त्यांच्या सोबत नव्हता. राठोड कुणालाही न भेटता विमानतळाच्या आत गेले व मिडीयासोबतही कोणत्या प्रकारचा संवाद साधला नाही.

