संजय राठोड हेच पूजा चव्हाणचे मारेकरी; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप!
‘संजय राठोड हेच पूजाचे मारेकरी असून, मंत्रिमंडळातुन त्यांची हकालपट्टी करून त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत’, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली. ‘आपण शेण खायचं आणि बचावासाठी समाजाला वेठीला धरायचं असा प्रकार पोहरादेवी येथे घडला आहे. खरंतर ही घाण एक क्षणही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असायला नको. ताबडतोब त्याला मंत्रिमंडळातून हाकललं पाहिजे मात्र, बलात्कारी मंत्र्यांना पाठिशी घालण्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळ एकजूट झालं आहे. त्यांची बाजू घेण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीत चढाओढ लागली आहे. हे चित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही’, अशा कठोर शब्दात वाघ यांनी राठोडांवर निशाणा साधला.
बीडच्या परळी वैजनाथ येथील २२ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिने पुण्यात आत्महत्या केली होती. या घटनेनंतर काही ऑडिओ क्लिप समोर आल्याने संजय राठोड हे संशयाच्या कचाट्यात अडकले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कसून चौकशी करण्याचे आदेश दिले. यावेळी १४ दिवस गायब असलेले संजय राठोड बुधवारी प्रथमच माध्यमांना सामोरे गेले. पोहोरादेवी येथे राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्ये प्रकरणी बोलताना सर्व आरोप फेटाळून लावत असताना ‘विरोधक घाणेरडं राजकारण करून मला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र, चौकशीत सत्य समोर येईलच’, असा पवित्रा राठोड यांनी घेतला.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राठोडांविरुद्ध ठसठशीत पुरावे उपलब्ध आहेत. त्या क्लिप मधील आवाज राठोड यांचाच असून त्यांना अटक का होत नाही? व पोलीस हाताची घडी घालून गप्प का आहेत? असा सवालही वाघ यांनी केला. कोरोना प्राधुरभाव लक्षात घेता व सर्व सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेले असताना पोहरादेवीत इतकी गर्दी का झाली याचा जाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच संजय राठोड यांना विचारायला हवा, अशी मागणी सुद्धा वाघ यांनी केली.