नाशिक (Nasik)

भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाईंना शिर्डीच्या १०० किमी आधीच पोलिसांनी घेतलं ताब्यात

शिर्डी: शिर्डी येथील साई संस्थानने महिलांच्या ड्रेसकोडाबाबत लावलेला फलक हटवण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई आज पुण्याहून शिर्डीकडे जाण्यासाठी रवाना झाल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांना नगरच्या सीमेवर सुपे टोलनाक्याजवळ रोखलं आणि ताब्यात घेतलं आहे. यावेळी देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना आम्ही शिर्डीला जाण्यावर ठाम आहोत अशी भूमिका मांडली आहे.

शिर्डीच्या १०० किमी आधीच पोलिसांनी तृप्ती देसाई आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी तृप्ती देसाई समर्थक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. “आम्ही आमच्या हक्काने अधिकारासाठी लढत आहोत. आज मानवी हक्क दिन आहे आणि त्याच दिवशी आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जातोय हे दुर्दैवी आहे”, असं तृप्ती देसाई म्हणाल्या. याशिवाय, “नगर पंचायतीच्या आदेशानुसार पोलिसांनी जर मला शिर्डीत बंदीची नोटीस धाडली आहे. तर पोलिसांशी चर्चा करण्याची माझी तयारी आहे. मी इथंच थांबून त्यांनी माझ्या सहकाऱ्यांना शिर्डीत जाऊ द्यावं”, असंही त्या पुढे म्हणाल्या. 

पोलिसांनी यावेळी तृप्ती देसाई यांचा ताफा अडविण्यासाठी याआधीच पूर्वतयारी केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव तृप्ती देसाई यांना सुपे टोलनाक्यावरच अडविण्यासाठी सकाळपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा टोल नाक्यावर तैनात करण्यात आला होता. 

साई मंदिरात येताना भारतीय पेहरावात यावे. तोकडे कपडे घालून येऊ नये”, असे आवाहन साई संस्थान केले आहे. यावर आक्षेप घेत तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. साई संस्थानने मंदिर परिसरात पेहरावा संबंधिच्या नियमाचे फलक लावले आहेत. देसाई यांनी साई संस्थानने लावलेले हे फलक हटविण्याची मागणी केली आहे. साई संस्थानने फलक काढला नाही, तर आपण स्वत: जाऊन फलक हटविण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला होता. त्यानंतर शिर्डी पोलिसांनी तृप्ती देसाई यांना सुरक्षेच्या कारणास्तव ८ ते ११ डिसेंबरमध्ये शिर्डीत प्रवेश बंदीची नोटीस पाठवली होती. तृप्ती देसाई यांनी पोलिसांची नोटीस धुडकावून लावत आज शिर्डीत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं होतं.

देसाई म्हणाल्या,”साई संस्थानने महिलांच्या ड्रेसकोडबाबत लावलेला तो बोर्ड हटवण्यासाठी आम्ही शिर्डीला चाललो आहोत. याद्वारे आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न होत आहे. आमचा हक्क मिळवण्यासाठी आम्ही शिर्डीकडे निघालो आहोत. मात्र, पोलिसांनी आम्हाला नगरच्या आधीच अडवलं असून याद्वारे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण पोलिसांनी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही शिर्डीला जाणारच आहोत.” तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुपे पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button