कोरोना पॉझिटिव्ह महिलेकडे डॉक्टराने केली शरीरसुखाची मागणी
औरंगाबाद: राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येताना दिसत आहेत. औरंगाबादमध्ये एक धक्कादायक आणि लाजीरवाणी घटना घडली आहे. कोरोनाची लागण झालेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेकडे शरीरसुखाची मागणी चक्क डॉक्टराने केली असल्याचा आरोप आहे. या घटनेबाबत कळताच संतप्त झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टराला बेदम मारहाण केली. या प्रकरणाची चौकशी करावी आणि अहवाल सादर करावा, असा आदेश आता औरंगाबादचे आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी दिला आहे. पण आता या डॉक्टराची रुग्णालयातून हक्कालपट्टी केल्याचे समोर आले आहे.
घटना अशी की, पदमपुरा येथील कोरोना उपचार केंद्रात दोन दिवसांपूर्वी एक महिला रुग्ण दाखल झाली. या महिलेचा मोबाईल नंबर घेऊन एक आयुष डॉक्टर तिला सतत फोन करत होता. मंगळवारी रात्री दोन वाजता डॉक्टरने या महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. तिला गच्चीवर नेण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध करत आरडाओरड केली. त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये गोंधळ उडाला. इतर कर्मचाऱ्यांनी महिलेची सुटका केली. पीडित महिला रुग्णालयात रडत होती.
त्यानंतर याबाबतची माहिती उपचार घेणाऱ्या महिलेने घरी कळवली. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात शिरुन डॉक्टराला बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करून अहवाल गुरुवारी सकाळपर्यंत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या घटनेबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
महानगरपालिकेकडून त्या डॉक्टरला हाकलले आहे, अशी माहिती औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी नीता पाटणकर यांनी दिली. घटनेची चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल मात्र, याबाबत महिलेने कुठलीही तक्रार दिलेली नाही त्यामुळे कायदेशीर कारवाई होऊ शकली नाही, असे पाटणकर म्हणालात.
याआधी अमरावतीमध्ये अशाच प्रकारची धक्कादायक घटना घडली होती. दारूच्या नशेत पोलीस पाटलाने गावातील क्वारंटाईन कक्षात शिरून महिलेला शरीरसुखाची मागणी केल्याचे समोर आले होते. एका बाजूला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना या प्रकारचे गुन्हे देखिल वाढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.