स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
मुंबई : स्वातंत्र्यलढ्यासह महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कार्याचा अजरामर ठसा उमटवणारे स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा ‘बाबूजी’ यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे आज मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) समोरील ऐतिहासिक चौकात थाटात अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा संपन्न झाला. मुंबईच्या मध्यवर्ती आणि महत्त्वपूर्ण ठिकाणी बाबूजींचा पुतळा स्थापित होणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी काढले.
यवतमाळ ते कारावास: स्वातंत्र्य चळवळीतील धगधगते पर्व
स्व. जवाहरलाल दर्डा यांना यवतमाळ येथील त्यांच्या शालेय जीवनापासूनच राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्य चळवळीची तीव्र प्रेरणा मिळाली होती. तरुण वयातच युवकांचे मोठे संघटन उभे करून त्यांनी ब्रिटीश सरकारविरोधातील अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक वेळा खडतर कारावासही भोगला. त्यांच्या या त्यागाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचा पाया रचला.
समाजकार्य आणि पत्रकारितेतील लोकाभिमुखतेचे प्रतीक – स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा ‘बाबूजी’ यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केले.
स्वातंत्र्यलढ्यासह महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक… pic.twitter.com/sKxrgSUlGa— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 2, 2026
लोकशाहीचा चौथा स्तंभ
स्वातंत्र्योत्तर काळात स्व. जवाहरलाल दर्डा यांनी राज्य सरकारमध्ये विविध महत्त्वाच्या खात्यांची मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना आपल्या लोकाभिमुख कामाची छाप उमटवली. केवळ राजकारणच नव्हे, तर पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी ‘लोकमत’सारखे प्रभावी आणि अग्रगण्य वृत्तपत्र सुरू केले. पत्रकारितेमध्ये सामान्यांचा आवाज बुलंद करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी आयुष्यभर केले.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती
या ऐतिहासिक सोहळ्याला महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री गिरीष महाजन, मंत्री ॲड. आशिष शेलार, आणि मंत्री संजय राठोड प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच, लोकमत माध्यम समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा आणि मुख्य संपादक राजेंद्र दर्डा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.



