करोना अपडेट : अमरावतीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची पुन्हा वाढ!
अमरावती : काहीच दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग कमी होत असतानाच अमरावती मध्ये लोकांनी या गोष्टींवर दुर्लक्ष केल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता वाढत आहे. या गोष्टीमुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे. अचानक रुग्णवाढीची कारणे काय हे अजूनही समजले नाही आहे. करोनाचा संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांकडे झालेले दुर्लक्ष यासाठी कारणीभूत मानले जात आहे.
अमरावतीमध्ये आतापर्यंत २३ हजार ८३५ कोरोनाबाधित लोकांची नोंद झाली आहे आणि त्यातून २२ हजार ६३० रुग्ण बरे झाले आहेत. ४२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर मृत्युदर हा १.८६ टक्के एवढा आहे. पण गेल्या १० दिवसांमध्ये १ हजार ९४८ कोरोनाबाधित रुग्ण आढळे आहेत. प्रशासनाला ही धोक्याची घंटा वाटत आहे.
मार्च महिन्यापासून आतापर्यंत १ लाख ८७ हजार ६७२ संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी १ लाख ६३ हजार ८९ जणांचे अहवाल नकारात्मक, तर २३ हजार ८३५ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. सलग रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता कमालीची वाढली आहे.
शासन नागिरकांना वारंवार मास्क, सॅनिटायझर चा वापर तसेच सामाजिक अंतर ठेवण्याचा सल्ला देत आहे. १ फेब्रुवारीला ९२ करोनाबाधितांची नोंद झाली. २ फेब्रुवारीला ११८, ३ फेब्रुवारीला १७९, ४ फेब्रुवारीला १५९, ५ फेब्रुवारीला २३३, ६ फेब्रुवारीला १९९, ७ फेब्रुवारीला १९२, ८ फेब्रुवारीला २३५, ९ फेब्रुवारीला १८३, तर १० फेब्रुवारीला हा आकडा अचानक वाढून ३५९ पर्यंत पोहचला आहे. गेल्या दहा दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढू लागल्याने जिल्ह्यात समूह संसर्गाची भीती आता व्यक्त व्हायला लागली आहे.