मुंबई

शिवसेनेच्या मागणीला यश, मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाव लवकरच नाना शंकरशेठ टर्मिनस होणार

मुंबई: मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेकडून होत असलेली मागणी केंद्राकडून लवकरच पूर्ण केली जाणार आहे. मुंबई येथील सेंट्रल टर्मिनसचे नाव लवकरच नाना शंकरशेठ टर्मिनस होणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेना उपनेते, खासदार अरविंद सावंत यांना पत्राच्या माध्यमातून दिली आहे.

मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं विधिमंडळात मंजूर करुन केंद्र सरकारकडं पाठवला होता. त्याबाबत काय निर्णय झाला याची माहिती खासदार सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना विचारली होती. त्याच्या उत्तरादाखल केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी हे पत्र खासदार अरविंद सावंत यांना पाठवले आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावावर प्रक्रिया सुरु असून सर्व संबंधित विभागांचा अहवाल आल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल असे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे

अरविंद सावंत यांनी यासंदर्भात सांगितले की, मुंबईच्या विकासात नाना शंकरशेठ यांचे मोठे योगदान आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्याला आधीच उशीर झाला आहे. राज्य विधिमंडळात प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर केंद्र सरकारकडून विलंब होण्याचे कोणतेही कारण नाही, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी त्याबाबत प्रक्रिया सुरु असल्याची माहिती दिल्याने लवकरात लवकर मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाना शंकरशेठ टर्मिनस होईल, अशी अपेक्षा खासदार सावंत यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button