विमानात टेकऑफ आणि लँडिंगदरम्यान लाईट्स का डिम करतात?
मुंबई : विमानाने प्रवास करताना टेकऑफ आणि लँडिंगच्या काही वेळ आधी केबिनमधील लाईट्सचा प्रकाश अचानक कमी केल्या जातात. हा अनुभव तुम्ही अनेकदा घेतला असेल. अनेक प्रवाशांना असे वाटते की ही गोष्ट प्रवाशांच्या सुटसुटीत आणि आरामदायी अनुभवासाठी केली जाते. पण यामागील कारण थोडे वेगळे आहे. या साध्या वाटणाऱ्या गोष्टीमागे अत्यंत गंभीर आणि विमानाच्या सुरक्षेशी संबंधित कारणे दडलेली आहेत. विमान सुरक्षेच्या आकडेवारीनुसार, हवेतील प्रवासादरम्यान सर्वाधिक अपघात हे टेकऑफ आणि लँडिंगच्या वेळीच होतात. ज्यामुळे या काळात वैमानिक आणि क्रू मेंबर्सवर सर्वाधिक ताण असतो. याच सुरक्षेचा भाग म्हणून विमानातील लाईट्सचा प्रकाश कमी केला जातो.
डोळ्यांसमोर येणारी अंधारी
जेव्हा एखादी व्यक्ती अचानक तीव्र प्रकाशातून अंधारात जाते, तेव्हा तिच्या डोळ्यांसमोर काही काळ अंधारी येते. मानवी डोळ्यांना अंधाराशी जुळवून घेण्यासाठी आणि दृष्टी सामान्य होण्यासाठी साधारण ५ ते २० मिनिटांचा कालावधी लागतो. जर विमानात वीज अचानक गेल्यास संपूर्ण केबिनमध्ये अंधार निर्माण होऊ शकतो. म्हणजेच तीव्र प्रकाशात बसलेल्या प्रवाशांना मार्ग दिसणे मुश्कील होऊ शकते. अशा स्थितीपासून दूर राहण्यासाठी क्रू मेंबर्स आधीच लाइट्सचा प्रकाश थोडा कमी करतात. जेणेकरुन कमी प्रकाशात प्रवाशांना आजूबाजूच्या गोष्टी पाहण्यास मदत होईल. जर आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास कोणत्याही विलंबाशिवाय आजूबाजूच्या गोष्टी देखील कमी प्रकाशात प्रवासी आजूबाजूच्या गोष्टी पाहू शकतात. याशिवाय विमानातून तातडीने एक्झिट करण्यासाठी मार्ग शोधू शकतात.
इमर्जन्सी एक्झिट स्पष्ट दिसणे आवश्यक
विमानातील आपत्कालीन एक्झिटच्या मार्गांवर (Emergency Exit Routes) एक विशेष प्रकारची प्रकाश यंत्रणा असते. ही यंत्रणा अशा साहित्यापासून बनवलेली असते जी संपूर्ण अंधारातही चमकते. अमेरिकेची फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) आणि युरोपची एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (EASA) या दोन्ही आंतरराष्ट्रीय संस्थांच्या नियमांनुसार, अंधारातही एक्झिटचा मार्ग स्पष्ट दिसणे बंधनकारक आहे. जर केबिनमध्ये आधीच तीव्र प्रकाश असेल, तर हा हलका चमकणारा मार्ग प्रवाशांना दिसणे कठीण होईल. लाईट्सचा प्रकाश कमी ठेवल्यामुळे हे एक्झिट साईन अधिक प्रभावीपणे चमकतात आणि प्रवाशांना बाहेर पडण्याचा मार्ग त्वरित ओळखता येतो. (Airplane Dim Lights Reason)
धूर किंवा गॅस लीक झाल्यास दिशाभूल टाळण्यासाठी
‘फ्लाइट सेफ्टी फाउंडेशन’च्या (Flight Safety Foundation) एका संशोधन अहवालानुसार, जर विमानात अचानक गॅस किंवा धूर पसरला, तर प्रवासी आपली दिशा ओळखण्याची क्षमता ८३ टक्क्यांपर्यंत गमावून बसतात. अशा भयानक परिस्थितीत जर केबिनमधील प्रकाश आधीपासूनच कमी असेल आणि एक्झिट साईन स्पष्टपणे चमकत असतील, तर प्रवाशांना योग्य दिशेने पुढे जाणे आणि स्वतःचा जीव वाचवणे अधिक सोपे होते.
खिडक्यांचे पडदे उघडे ठेवण्याचे कारण
टेकऑफ आणि लँडिंगच्या वेळी केबिन क्रू प्रवाशांना खिडक्यांचे पडदे उघडे ठेवण्याची सूचना देतात. यामागेही सुरक्षेचेच मोठे कारण आहे. खिडकीतून बाहेरचा नैसर्गिक प्रकाश आत आल्यामुळे क्रू आणि प्रवासी दोघांनाही बाहेरील परिस्थितीचा अचूक अंदाज येतो. समजा विमानाच्या इंजिनमध्ये काही बिघाड झाला किंवा पंखांमध्ये काही असामान्य हालचाल दिसली, तर खिडकीतून बाहेर पाहून त्याची वेळेत माहिती मिळू शकते. प्रवाशांनी खिडकीतून तांत्रिक बिघाड पाहून क्रूला सावध केल्याच्या आणि त्यामुळे मोठे अपघात टळल्याच्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत.



