FeaturedHealth & FitnessMaharashtra Govआरोग्यमालेगाव

आरोग्य सेवेला तंत्रज्ञानाची जोड; मालेगावात दोन दिवसात कार्यान्वित होणार टेली रेडिओलॉजी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मालेगाव, दि. १३ : कोरोना विषाणूमुळे शहरातील मोठ्या प्रमाणात नागरिक बाधित झाले असून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य सेवेला आता तंत्रज्ञानाची जोड देण्यात येणार आहे, त्यासाठी येत्या दोन दिवसात मालेगाव शहरातील रुग्णालयात ‘टेली रेडिओलॉजी’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

मालेगाव शहरातील कोरोना विषाणूमुळे वाढती रुग्णसंख्या व वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे, महापौर ताहेरा शेख, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, विभागीय आयुक्त राजाराम माने, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ.आरती सिंग, माजी आमदार आसिफ शेख, माजी महापौर रशिद शेख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

न्यूमोनियासह अन्य टेस्टिंगसाठी एक्स-रे महत्त्वाचा असून त्याचा रिपोर्ट हा टेलि रेडिओलॉजीच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांकडे जावून त्यावर योग्य उपचाराची दिशा ठरणार आहे. त्यामुळे रुग्णाला त्याचे निदान व आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात येणारे उपचार तत्काळ मिळणार आहेत. त्याचबरोबर नाशिकमध्ये ‘टेली मेडिसीनची’ व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांना आवश्यक उपचाराबाबत सल्ला व उपचाराची योग्य दिशा देणार आहेत. या माध्यमातून कोविड व नॉन कोविड अशा सर्व रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचेही आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले.

मालेगाव मध्ये डेडिकेटेड कोविड सेंटर वाढविण्याची गरज लक्षात घेवून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. हज हाऊस मध्ये ऑक्सिजन लाईन घेण्यात आली असून एम.एस.जी. महाविद्यालयात सुसज्ज अशी आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात नवीन रुग्णालय वाढविण्यावर भर देण्यात येत असून त्यासाठी आवश्यक डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व अन्य आवश्यक बाबी पुरविण्याचे काम करण्यात आले आहे. कोविड-19 च्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णांच्या लक्षणांचा सुक्ष्म पद्धतीने अभ्यास करुन मोठ्या संख्येने रुग्णांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. नॉन कोविड रुग्णालयासह कोविड रुग्णालयात आवश्यक सर्व सुविधा देण्याचे काम करण्यात आले आहे. त्याच बरोबर एक्स-रे मशिन व अत्यावश्यक साहित्य सामग्री पुरविण्यावर भर देण्यात येणार आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV) लॅबमधून दररोज 300 टेस्टींग रिपोर्ट 24 तासात मिळणार आहेत, तसेच धुळ्यात नवीन 450 प्रतिदिन अहवाल देणारी लॅब पूर्ण क्षमतेने येत्या दोन दिवसात सुरु होणार आहे. त्यामुळे मालेगावचे टेस्टिंग रिपोर्ट प्रलंबित राहण्याचा विषय आता मार्गी लागला असून रुग्णांचे निदान व उपचार वेळेत मिळणार असल्याचेही आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले.

खाजगी रुग्णालये जरी सुरु झाले असले तरी, त्यात केवळ ओपीडी कार्यान्वित आहेत. आयपीडी अजून सुरू नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून नियमित अहवाल सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे. मोबाईल व्हॅन्सच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्यासाठी पुरेशा प्रमाणात डॉक्टर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी-कर्मचारी हजर होत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button