मुंबादेवी आणि परिसराच्या विकासासाठी आवश्यक निधी देणार – वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबादेवी आणि परिसराचा विकास करण्यासाठी शासनाच्या वास्तु विशारदामार्फत विकास आराखडा तयार करून त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मुनगंटीवार यांनी मुंबादेवीचे दर्शन घेऊन तेथील दागिना बाजारला भेट दिली. तेथील उद्योजक – व्यापारी यांच्याशी चर्चा केली तसेच मुंबादेवी उद्यानाचेही त्यांनी उद्घाटन केले. यावेळी आमदार राज पुरोहित आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्याच्या विकासात कररूपी योगदान देणारे व्यापारी – उद्योजक हे अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहेत. ते आपल्या उद्योग – व्यवसायाच्या भरभराटीतून मोठ्या प्रमाणात शासनाकडे कर भरतात, देशाला मजबूत करतात. त्यातूनच राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, वंचितांच्या विकासासाठी शासन योजना आखते, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.