मनोरंजनमुंबईसेलिब्रिटी

‘नवरी नटली’ या गाण्याने घराघरांत पोहचलेले लोककलाकार छगन चौगुले यांचे निधन

लोककलावंत छगनराव चौगुले यांच्या निधनाने महाराष्ट्राचे सांस्कृतिक नुकसान-अमित देशमुख

मुंबई : ‘खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली’ या खड्या आवाजातील गाण्याने घराघरांत पोहचलेले नामवंत लोककलाकार छगन चौगुले यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मुंबई येथील सेव्हन हिल्स रुग्णालात त्यांच्यावर उपचार सुरू होते; पण अखेर त्यांनी आज रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

‘कथा देवतारी बाळूमामा’, ‘कथा चांगुणाची’, ‘कथा श्रावण बाळाची’, ‘आईचे काळीज’, ‘अंबाबाई कथा : कथा तुळजापूरची भवानी’ असे छगन चौगुले यांच्या आवाजातील एकापेक्षा एक अल्बम आजही रसिकांमध्ये लोकप्रिय आहेत. घरोघरी त्यांच्या दोन-तीन कॅसेट हमखास असायच्याच. खंडेरायाची गीतं, बाळूमामाची कथा, अंबाबाईची कथा, कथा भावाभावाची, कथा बहीण-भावाची अशा लोककथांच्या त्यांच्या अनेक कॅसेट प्रसिद्ध होत्या. ‘खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली’ या गाण्याने चौगुले यांना विशेष ओळख मिळवून दिली होती. अनेक कार्यक्रमांमध्ये छगन चौगुले यांचं हे गाणं हमखास सादर होतं. २०१८ मध्ये त्यांना ‘लावणी गौरव’ पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

छगन चौगुले यांनी गायलेली कुलदैवतांची भक्तिगीते आणि लोकगीते विशेष गाजली. जागरण गोंधळी असलेले छगन चौगुले अंगभूत गुणांमुळे लोककलावंत म्हणून प्रसिद्ध झाले. कला सादर करण्याची त्यांची पद्धत इतरांपेक्षा जरा वेगळीच होती.

लोककलावंत छगनराव चौगुले यांच्या निधनाने महाराष्ट्राचे सांस्कृतिक नुकसान झाले आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

श्री. देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात, छगनरावांची गाणी ही महाराष्ट्रात विशेषत: ग्रामीण भागात प्रचंड लोकप्रिय ठरली. महाराष्ट्रातील लोकगीतं, लोककला, लोकसंस्कृतीच्या प्रचार, प्रसारासाठी छगनरावांनी दिलेलं योगदान महाराष्ट्र कायम लक्षात ठेवेल. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या माध्यमातून त्यांनी लोककलांचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी घडवले. छगनराव चौगुले यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या लोककलेचे नुकसान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button