महावितरणच्या प्रत्येक “जिल्हा कार्यालयाला ताला ठोको” आंदोलन
कोल्हापूर : ‘दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणा-या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची लॉकडाऊन काळातील ६ महिन्यांची संपूर्ण वीज देयके माफ करणेत यावीत व त्या रकमेची भरपाई राज्य सरकारने करावी. अंतिम निर्णय होईपर्यंत घरगुती वीज बिले भरणार नाही व वीज पुरवठा तोडू देणार नाही’ अशी घोषणा करून या मागणीसाठी राज्यात सर्व जिल्ह्यांत महावितरण कंपनीच्या “जिल्हा कार्यालयांना ताला ठोको” आंदोलन मंगळवार दि. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता करण्यात येईल असे महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृति समिती यांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर ताला ठोको मध्ये जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणा-या या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील किमान १० हजार पेक्षा जास्त वीज ग्राहक व शेतकरी सहभागी होतील असेही राजू शेट्टी, प्रताप होगाडे, विक्रांत पाटील किणीकर, आर. के. पोवार यांनी सांगितले.
राज्यातील विविध राजकीय पक्ष व संघटनानी जुलै पासून वीज बिल माफी साठी विविध आंदोलने केली आहेत. राज्यातील २३ हून अधिक जिल्ह्यांत दि. १३ जुलै रोजी राज्यस्तरीय वीज बिल होळी आंदोलन झाले. २०% ते २५% सवलत देऊ अशी घोषणा खुद्द ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जुलै २०२० अखेरीस केली. ती मान्य नसल्याने संपूर्ण वीज बिल माफी साठी पुन्हा दि. १० ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय धरणे आंदोलन झाले. पण घोषणेनंतर अडीच महिन्यात प्रत्यक्ष निर्णय वा कार्यवाही कोणतीही नाही, हे अत्यंत खेदजनक आहे. २०% ते २५% सवलत हीही अत्यंत अपुरी व जनतेमध्ये नाराजी निर्माण करणारी आहे. त्यामुळे ६ महिन्यांची संपूर्ण वीज बिल माफी झाली पाहिजे, अशी मागणी सहभागी सर्व पक्ष व संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.



