Health & FitnessMaharashtra GovSatara (सातारा)

शरद पवारांच्या आवाहनाला मकरंद पाटलांची साद, करणार हे कार्य

सातारा : कोरोनाचा नायनाट करणारी लस तयार होईपर्यंत वाई मतदारसंघातील कोरोनाबाधित रुग्णांची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. या रुग्णांना द्यावी लागणारी इंजेक्‍शन्स महागडी आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यासाठी वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघात पाचशे इंजेक्‍शनची बॅंक सुरु करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांनी दिली.

गरजू रुग्णांसाठी मोफत इंजेक्‍शन्स उपलब्ध करून देण्याची भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे. त्यानुसार वाई मतदारसंघात पाचशे इंजेक्‍शन्स उपलब्ध करून देण्याचा संकल्प आमदार मकरंद पाटील यांनी केला आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत महाबळेश्वरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे एका उद्योगपतीने ४१ इंजेक्‍शन्स उपलब्ध करून दिली आहेत.

वाई शहर व तालुक्‍यातील गणेश मंडळांनी यावर्षी अत्यंत साधेपणाने उत्सव करून, ५० इंजेक्‍शन देणार आहे. वाई जैन समाजाने २५ इंजेक्‍शन उपलब्ध करून दिली आहेत. वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघातील अनेक घटक पुढे आले असून ते या कामात योगदान देत आहेत. त्यांच्या दातृत्वाचा आदर्श घेत इतरांनीही याकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेमेडिसिव्हर इंजेक्‍शनची मदत करावी, असे आवाहन केल्यानुसार महाबळेश्वर तालुक्‍यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी नुकतीच ही इंजेक्‍शन आमदार पाटील यांच्याकडे सोपवली. ही इंजेक्‍शन महागडी असल्याने सर्वसामान्य रुग्णांना ती घेणे परवडत नाहीत. त्यादृष्टीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यानी सातारा जिल्ह्यासाठी १२५ इंजेक्‍शन पाठवली होती. वाईतील रुग्णांसाठी अशी इंजेक्‍शन मिळाली पाहिजेत, अशी भूमिका घेऊन आमदार मकरंद पाटील विविध बैठकांमध्ये कार्यकर्त्यांना मदतीचे आवाहन करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button