सविता रणदिवे यांचे निधन
मुंबई :संयुक्त महाराष्ट्र निर्माण चळवळीतील अग्रणी व ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पत्नी उषा ऊर्फ सविता रणदिवे (८७) यांचे आज पहाटे दादर येथील निवास्थानी निधन झाले. त्या भायखळा येथील मम्माबाई हायस्कूलमधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाल्या होत्या.
ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पत्नी सविताताई रणदिवे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘एका व्रतस्थाची ही सावली हरपली’, अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
निखळ पत्रकारितेसाठी जीवन अर्पण करणाऱ्या दिनू रणदिवे यांच्या मागे सविताताई तितक्याच खंबीरपणे उभ्या होत्या. शिक्षिका म्हणून अनेकांना घडविणाऱ्या सविताताईंनी पतीच्या ध्येयवादी पत्रकारीतेसाठी तितक्याच समर्थपणे साथ दिल्याचे शोक संदेशात म्हटले आहे.
सविता यांनीही संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान दिले होते. त्या राष्ट्रसेवा दलाच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. दिनू यांच्या कामात त्या सक्रिय भाग घेत असत. दिनू यांनी दैनिक काढण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना व्यंग्यचित्र काढण्याची विनंती केली. बाळासाहेबांनी ती मान्य केली. बाळासाहेब यांच्याकडून दररोज व्यंग्यचित्र आणायचे काम सविता करत होत्या.
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, या आदर्शाने त्या जगल्या. सविता यांनी दिनू यांच्यासोबत स्वतःला सामाजिक कामांना वाहून घेतले होते. श्रमिक, आदिवासी, कामगार, शोषित यांच्या त्या मोठ्या आधार होत्या.

