Health & FitnessMaharashtra Govकल्याण (Kalyan)केडीएमसीमुंबई

कल्याण डोंबिवलीतील कोरोनाची परिस्थिती न सुधारल्यास भाजप आक्रमक भूमिका घेणार – विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचा इशारा

कल्याण-डोंबिवलीमधील कोरोना परिस्थितीचा घेतला आयुक्तांसोबत आढावा

कल्याण दि. २३ जून : राज्यात शिवसेनेची सत्ता, ठाण्यात शिवसेनेचे मंत्री, कल्याणमध्ये शिवसेनेचे खासदार, आमदार, महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता एवढे सगळे असूनही केवळ राजकीय इच्छाशक्ती आणि समन्वयाअभावी आज कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र येत्या ८ दिवसांत कल्याण डोंबिवलीतील कोरोनाची परिस्थिती सुधारली नाही, तर भाजप आक्रमक भूमिका घेईल असा जोरदार इशारा विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे. डोबिंवलीतील शास्त्रीनगर नगरपालिका रुग्णालय हे कल्याण-डोंबिवलीतील सर्व सामान्य गोरगरिब जनतेचं रुग्णालय असून या मोठ्या रुग्णालयात फक्त दोन व्हेंटिलेटर उपलब्ध असून त्यापैकी एक नादुरुस्त होते. तसेच जाहिरात आणि चांगला पगार देऊनही रुग्णालयात फिजिशियन उपलब्ध होत नाही. त्यामुळे शासनाने प्रतिनियुक्तीवर फिजिशयन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करुन द्यावे यासाठी दरेकर यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. त्यानंतर, शास्त्रीनगर नगरपालिका रुग्णालयासाठी प्रतिनियुक्तीवर फिजिशयन आणि चार ते पाच व्हेंटिलेटर तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्याची माहिती दरेकर यांनी यावेळी दिली.

कल्याण डोंबिवलीतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी आज महापालिका आयुक्त आयुक्त विजय सुर्यवंशी यांच्या सोबत आढावा बैठक घेतली व तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयालाही भेट देऊन पाहणी केली. तसेच टाटा आमंत्रा येथील क्वारांटाईन सेंटरलाही दरेकर यांनी भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी खासदार कपिल पाटील, माजी राज्यमंत्री आमदार रविंद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, भाजप सरचिटणीस नरेंद्र पवार, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे विरोधीपक्ष नेते राहुल दामले, माजी उपमहापौर व नगरसेवक मोरेश्वर भोईर, गटनेते शैलेश धात्रक, नगरसेवक दया गायकवाड, भाजपचे कल्याण-डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना प्रविण दरेकर यांनी सांगितले की, आजच्या परिस्थितीमध्ये कल्याण डोंबिवलीकर खूप भोगत आहेत. हॉस्पिटलमधील व्यवस्था आणि समन्वयाच्या अभावाने कल्याण डोंबिवलीत मृत्यू वाढत चालले आहेत. महानगरपालिका आणि इथल्या राजकीय नेतृत्वामध्ये ताळमेळ नाही. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसाठी जास्त निधी लागत नाही. मात्र तेव्हढे देखील ही महापालिका उपाययोजना करू शकत नाही हे सत्ताधाऱ्यांचे अपयश असल्याची टिकाही विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी यावेळी केली. रुग्णालयातील अपुरी वैदयकीय व्यवस्था तसेच कोरोना रोखण्यासाठी अपुरे मनुष्यबळ आदी सर्व मुद्द्यांबाबत आजच्या बैठकीत महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आली आहे. त्याबद्दल आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पण येत्या ८ दिवसांत आम्हाला कल्याण डोंबिवलीच्या परिस्थितीत बदल दिसला नाही तर भाजपतर्फे उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दरेकर यांनी यावेळी दिला.


पर्यवरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघाच्या उपाययोजनांबाबत स्पेशल केस म्हणून एक न्याय आणि कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या ठाणे, कल्याण डोंबिवलीमध्ये दुसरा न्याय, असा दुजाभाव का असा सवालही त्यांनी यावेळी केला.
कल्याण डोंबिवलीला कोरोनाने विळख्यात घेतले आहे. डायबिटीस किंवा गंभीर आजाराने त्रस्त रुग्णांना कोरोना होतो अशी आपली मानसिकता आहे. परंतु कल्याण डोंबिवली येथे ३० ते ४० वयोगटातील तरुण हे कोरोना ग्रस्त होत आहेत.तरुणांचे कोरोना ग्रस्त होण्याचे प्रमाण साधारणतः ७० टक्के इतके आहे.ही आपल्यासाठी अत्यंत गंभीर बाब आहे. अशाप्रकारे तरुण-तरुणी बाधित होत असतील तर हा आपल्यासाठी धोक्याचा इशारा आहे. म्हणून आयुक्तांना आवश्यक उपाययोजना तात्कालिक रित्या कार्यान्वित कराव्या अशी मागणी आयुक्तांकडे केल्याचे श्री.दरेकर यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button