मनात शिक्षणाची जिद्द होती, एकनाथ शिंदेंनी ७७.२५ टक्के मिळवत प्राप्त केली पदवी
ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वयाच्या ५६व्या वर्षी पदवी परीक्षा पास होऊन शिक्षणाला वयाची अट नसते हे दाखवून दिले आहे. शिंदे यांनी पदवी परीक्षेत ७७.२५ टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळविले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. शिंदे यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयातून पदवीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत ७७.२५ टक्के गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले आहेत. वयाच्या ५६व्या वर्षी पदवीधर होणारे ते राज्यातील बहुदा पहिलेच मंत्री असण्याची शक्यता आहे.
ज्ञानपीठ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ठाण्यातील केंद्र असून दरवर्षी या केंद्राचा निकाल १०० टक्के लागतो. याही वर्षी निकाल १०० टक्के लागला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आमच्या विद्यालयाची निवड केली, याचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यांनी अंतिम वर्षासाठी मराठी आणि राजकारण या दोन विषयांची निवड केली होती, अशी माहिती विद्यालयाच्या केंद्र संयोजक तथा प्राचार्या प्रीती जाधव यांनी दिली.
मला ऐन उमेदीच्या काळात काही कारणास्तव शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते; परंतु संधी मिळताच शिक्षण पूर्ण करण्याची तळमळ होती. त्यामुळे संधी मिळताच सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्ष कला शाखेत प्रवेश घेऊन शिक्षणाचा पुनश्च श्रीगणेशा केला होता.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्क येथे आले असता शिंदे यांनीच ते पास झाल्याची माहिती दिली. सगळ्यांनाच आपल्या मनासारखं शिक्षण घेता येत नाही. श्रीकांत डॉक्टर झाले. पण माझं शिक्षण अर्धवट राहिलेलं होतं. मनात शिक्षणाची जिद्द होती. तळमळ होती. शिक्षणाचे महत्त्व काय आहे हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे पदवीधर व्हायचंच अशी मनाशी खुणगाठ बांधली आणि जसा जसा वेळ मिळाला तशा परीक्षा दिल्या आणि आज बीए पास झालो, असं शिंदे म्हणाले आहेत.