मुंबईत दोन पोलिसांवर माथेफिरू तरुणाचा कोयत्याने हल्ला
पोलिसांवरील हल्ला सहन केला जाणार नाही : गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई
मुंबई : देशात एकीकडे कोरोनाचे संकट आहेत तर दुसरीकडे या कठीण परिस्थितीत दिवस- रात्र सेवा देणाऱ्या पोलिसांवर भ्याड हल्ल्याचे प्रकारही दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . मध्य रात्री दीड वाजता मरीन ड्राइव्ह येथे हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला हटकल्याने या माथेफिरू तरुणाने गस्तीवरील दोन पोलिसांवर धारदार कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज पहाटे मरीन ड्राइव्ह येथे हा प्रकार घडला असून या हल्ल्यात दोन्ही पोलीस जखमी झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात दिवसरात्र काम करणाऱ्या पोलिसांवरच हल्ले केले जात असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
माहितीनुसार ,करण प्रदीप नायर असं या माथेफिरूचं नाव आहे. तो ब्रीच कँडीच्या सिल्व्हर ओक इस्टेटमध्ये राहतो. पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम आणि पोलीस उपनिरीक्षक शेळके हे आज मध्यरात्री दीड वाजता मरीन ड्राइव्ह येथे नाकाबंदीच्या ड्युटीवर होते. यावेळी त्यांना प्राणसुखलाल मफतलाल हिंदू स्विमींग बाथ अँड बोट क्लब येथे नायर हातात कोयता घेऊन फिरत असल्याचं दिसला. त्यामुळे पोलिसांनी त्याला थांबवून हटकण्याचा प्रयत्न केला असता नायरने तेथून पळ काढला. त्यामुळे या दोन्ही पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता नायरने त्यांच्यावर धारदार कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात कदम यांच्या खांद्याला तर शेळके यांच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच डिसीपी संग्रामसिंग निशानदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी पोलिसांना तात्काळ जेजे रुग्णालयात दाखल केले.

नायरला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. नायर हा कृषी विषयातील पदवीधर आहे. तो मध्यरात्री कोयता घेऊन घराबाहेर का आला होता? याचाही तपास पोलीस करत आहेत.
एकीकडे राज्यात कोरोनाचे भीषण संकट आहे. तर दुसरीकडे पोलिसांवरील हल्ल्यांची संख्या वाढतच चालली आहे. हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला हटकल्याने या माथेफिरू तरुणाने गस्तीवरील दोन पोलिसांवर धारदार कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावर गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनीही निषेध व्यक्त केला .
पोलिसांवर हल्ला हा आमच्यावरील हल्ल्यासारखं आहे. अडचणीची परिस्थिती आहे. पोलिसांना आवाहन करतो की, तुम्ही मनोधैर्य खचू देऊ नका. तुमच्यावर हल्ला करेल त्याच्यावर तातडीने कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. दरम्यान हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून जखमी पोलिसांवर उपचार सुरु आहे .

