महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात, पहिल्यांदाच पाच कार्याध्यक्षांचीही नियुक्ती
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने आपल्या महाराष्ट्रातील नेतृत्वात बदल केला असून, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत अवघी एक जागा काँग्रेसला जिंकता आली. त्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला होता. विधानसभा निवडणुका आपल्या नेतृत्वाखाली नकोत, असा त्यांचा आग्रह होता. शेवटी पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा थोरात यांच्याकडे सोपविली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवड करण्यात आली आहे. थोरात यांच्याकडे निवडणूक व रणनीती समितीची सूत्रेही सोपविली आहेत तर के. सी. पाडवी यांच्याकडे विधिमंडळ पक्षनेतेपद देण्यात आले आहे. थोरात यांच्यासमवेत नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुजफ्फर हुसेन यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

इतर समित्या व त्यांचे अध्यक्ष
समन्वय समिती : सुशीलकुमार शिंदे
जाहीरनामा समिती : पृथ्वीराज चव्हाण
माध्यम व संवाद समिती : राजेंद्र दर्डा
प्रचार समिती : नाना पटोले
प्रसिद्धी – प्रकाशन समिती : रत्नाकर महाजन
निवडणूक व्यवस्थापन समिती : शरद रणपिसे
