मुंबई : सोमवारी सायंकाळी रायगड जिल्ह्यातील महाड येथे पाच मजली इमारत कोसळल्यामुळे आपले संपूर्ण कुटुंब गमावलेल्या चार वर्षांच्या दोन लहानग्यांचे पालकत्व स्वीकारून पालकमंत्र्यांची जबाबदारी नगरविकासमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली आहे.
कोसळलेल्या इमारतीत मोहम्मद बांगी आणि अहमद शेखनाग अशी नावे असलेल्या दोन लहानग्यांनी आपले संपूर्ण कुटुंब गमावले आहे. बचाव कार्यादरम्यान, तब्बल १८ तासांच्या प्रयत्नानंतर मोहम्मद बांगी याला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात मदत पथकाला यश मिळाले होते. परंतु, त्याची आई आणि भावंडांचा मात्र दुर्दैवी अंत झाला. तर, इमारत कोसळत असताना अहमद शेखनाग वेळीच बाहेर पडल्यामुळे बचावला असून त्याचे कुटुंबीय मात्र या दुर्घटनेचे बळी पडले.
त्यामुळे शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही लहानग्यांचे पालकत्व स्वीकारत असल्याचे जाहीर केले आहे. दोन्ही मुलांच्या नावे बँक खात्यात प्रत्येकी १० लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येतील, तसेच त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्यावतीने उचलण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या दुर्घटनेचे वृत्त समजताच शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून मदतकार्याला वेग दिला होता. ठाणे महापालिकेची दोन आपत्कालीन पथके आणि अग्निशमन दलाची तुकडीही शिंदे यांच्या आदेशानुसार मदतकार्यात व्यग्र आहे. ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला आधीपासूनच शिकवण होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आजही बाळासाहेबांच्या तत्त्वानुसार आणि विचारानुसार वाटचाल करत आहे. त्यामुळे सामाजिक जाणिवेच्या भावनेतून या मुलांचे पालकत्व स्वीकारत आहे.’ असे शिंदे यांनी सांगितले.

