राज्यपाल म्हणाले, झालेली घटना अत्यंत क्लेशदायक, कुटुंबियांना दोन लाखाची मदत जाहीर
भंडारा: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा बालकांचा झालेला मृत्यू अत्यंत क्लेशदायक आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, असे निर्देश देतानाच प्रत्येक मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथील सामान्य रुग्णालयाच्या पाहणीनंतर सांगितले.
राज्यपाल कोश्यारी यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती घेतली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, खासदार सुनिल मेंढे, आमदार परिणय फुके, नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव आदी उपस्थित होते. गेल्या शनिवारी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुणालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीत दहा बालकांचा मृत्यु झाला होता.
तसेच सात बालकांना सुरक्षितपणे वाचविण्यात आले. वाचलेल्या बालकांच्या कक्षाला राज्यपाल कोश्यारी यांनी भेट देवून शिशूंच्या मातांसोबत संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. बालक व मातांची योग्य काळजी घेण्याची सूचना यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली. त्यानंतर दुर्घटनाग्रस्त आयसीयु कक्षाला भेट दिली. ही पाहणी केल्यानंतर कोश्यारी यांनी या घटनेत मृत पावलेल्या प्रत्येक बालकांच्या कुटुंबियांना स्वेच्छानिधीतून दोन लाख रुपये मदत देण्यासंदर्भात सूचना दिल्या.
तत्पूर्वी राज्यपालांचे सकाळी येथील विश्रामगृहावर आगमन झाले. त्यांनी जिल्हाधिकारी संदीप कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्याकडून त्यांनी रुग्णालयातील आगीच्या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतली. विविध संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी राज्यपालांना भेटून या घटनेसंदर्भात निवेदन दिले.
भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या सिक न्यू बॉर्न बेबी केअर युनिट या वॉर्डात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून धूर पसरला. वॉर्डात असलेल्या १७ पैकी १० बाळांचा मृत्यू झाला. बाकीच्या बाळांना वाचवण्यात हॉस्पिटलचे आणि अग्नीशमन दलाचे कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नांना यश आले. ही दुर्घटना शनिवार मध्यरात्री दीड ते दोन दरम्यान घडली. महाराष्ट्र सरकारने घटनेची गंभीर दखल घेतली. सखोल चौकशीचे आदेश दिले. भंडारा दुर्घटनेप्रकरणी दोषींवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. रात्री ड्युटीवर असलेल्या नर्स व वॉर्ड बॉय यांनी तातडीने खिडक्या, दरवाजे उघडली. वॉर्डातील तसेच शेजारच्या वॉर्डातील बाळांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम केले. यामुळे ७ बाळांना वाचवणे शक्य झाले. दुर्घटनेत १० बाळांचा मृत्यू झाला. यापैकी ३ बाळांचा आगीत होरपळून तर उर्वरित ७ बाळांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बाळांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दुर्घटनेत मृत्यू झालेली बालकं एक ते तीन महिने वयोगटातील होती. वजन कमी असणे, प्रकृती नाजूक असणे या कारणामुळे बाळांवर उपचार सुरू होते आणि त्यासाठीच त्यांना सिक न्यू बॉर्न बेबी केअर युनिट येथे ठेवले होते. या वॉर्डमध्ये मध्यरात्री आग कशी लागली याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.