Maharashtra Govमुंबई

‘देवाभाऊ सहकार टॅक्सी’ योजनेत डबेवाला कामगारांनाही संधी द्या; मुंबई डबेवाला असोसिएशनची प्रवीण दरेकरांकडे मागणी

मुंबई आणि एमएमआर परिसरात सुरू होणाऱ्या ‘देवाभाऊ सहकार टॅक्सी’ या नव्या आणि प्रवाशांच्या खिशाला परवडणाऱ्या टॅक्सी सेवेमध्ये डबेवाला कामगारांनाही प्राधान्याने सामावून घेण्यात यावे, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनने केली आहे. यासाठी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आमदार प्रवीण दरेकर यांची वांद्रे येथील कार्यालयात भेट घेऊन निवेदन सादर केले.

१३५ वर्षांच्या परंपरेला कोरोनानंतर फटका
मुंबईत गेली तब्बल १३५ वर्षे डबेवाला कामगारांची सेवा सुरू आहे. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाऊननंतर डबे पोहोचविण्याच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून अनेक डबेवाला कामगारांच्या रोजगारावर संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ‘देवाभाऊ सहकार टॅक्सी’ योजनेत प्राधान्याने संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

वाहन परवाना असलेल्या कामगारांना प्राधान्य देण्याची मागणी
मुंबई डबेवाला असोसिएशनने दिलेल्या निवेदनात, ज्या डबेवाला कामगारांकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे, त्यांना टॅक्सी सेवेत प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तसेच टॅक्सी खरेदीसाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे आणि मराठी डबेवाला कामगारांना टॅक्सी परमिट देण्यात यावे, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

प्रवीण दरेकरांचे आश्वासन
यावेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी डबेवाला कामगारांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. वाहन चालविण्याचा परवाना असलेल्या कामगारांना टॅक्सी खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच ज्यांच्याकडे वाहन परवाना नाही, त्यांना परवाना मिळवून देण्यासाठीही आवश्यक मदत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.(Devabhau Sahakar Taxi)

दरेकरांचे आभार
प्रवीण दरेकर यांच्या सकारात्मक भूमिकेबद्दल मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी त्यांचे आभार मानले. डबेवाला कामगारांच्या पुनर्वसनासाठी ही योजना महत्त्वाची ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Back to top button