‘टकाटक’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ !
दिग्दर्शक मिलिंद कवडे यांचा ‘टकाटक’ हा मराठी चित्रपटसृष्टीत नवा ट्रेंड आणणारा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरल्याचं चित्र बॉक्स ऑफिसवर पहायला मिळत आहे. मराठीत प्रथमच सेक्स कॉमेडी हा प्रकार हाताळण्यात आल्यानं ‘टकाटक’ या चित्रपटाच्या कुतूहलापोटी शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर फर्स्ट शोपासूनच प्रेक्षकांनी सिनेमा पाहण्यासाठी गर्दा केल्याचं चित्र महाराष्ट्रभर पहायला मिळत असून तीन दिवसांत या चित्रपटाने एकूण ३ कोटी ५ लाखांचा गल्ला जमवला. पुढे देखील हा चित्रपट जबरदस्त कमाई करतोय.
पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि गांववाला क्रिएशन्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘टकाटक’ची निर्मिती ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदरजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे यांनी केली आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहे. विशेषतः तरूणाईनं या चित्रपटाला ‘टकाटक’ रिस्पाँस देत या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत आलेला नवा ट्रेंड आवडल्याची जणू पोचपावतीच दिली आहे. चित्रपटाची भाषा जरी बोल्ड असली तरी त्यातील कंटेंट खूप महत्त्वाचा असल्याचं तरूणाईचं म्हणणं आहे. मूळात ‘टकाटक’चं बोल्ड असणं ही कथेचीच गरज असून, यातील भाषा, शैली आणि एकूणच वातावरण युथफुल असल्याचंही कॉलेज वर्गातील प्रेक्षकांचं म्हणणं आहे. हा चित्रपट वरकरणी जरी बोल्ड वाटत असला तरी यात धमाल, मजा, मस्ती आहे. आज आपल्या आजूबाजूला काय घडत आहे? कशा प्रकारचं वातावरण आहे? त्याची हाताळणी कशाप्रकारे करणं गरजेचं आहे? याचं अचूक चित्रण ‘टकाटक’मध्ये पहायला मिळत असल्याचं तरूणींचं म्हणणं आहे, त्यामुळे एकूणच हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचं एक परीपूर्ण पॅकेजच असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
प्रथमेश परब आणि रितीका श्रोत्री या मुख्य भूमिकेतील जोडीची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना भावत आहे. अभिजीत आमकर आणि प्रणाली भालेराव या आणखी एका नव्या को-या जोडीची धम्मालही अनुभवायला मिळते. त्यांच्या जोडीला भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर आदी दमदार कलाकारांच्या अभिनयाची टकाटक फोडणी ‘टकाटक’ला एका वेगळ्याच उंचीवर नेण्यास कारणीभूत ठरते. मिलिंद कवडे यांची दिग्दर्शनशैली खूप वेगळी असून, टकाटक पाहताना पुन्हा एकदा त्याची प्रचिती येते. चित्रपटातील गाणी केवळ श्रवणीयच नसून, नेत्रसुखद अनुभव देणारीही आहेत. यातील संवाद बोल्ड असले तरी अर्थपूर्ण आहेत. दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या बळावरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
पर्पल बुल एंटरटेनमेंट आणि पिकल एंटरटेनमेंटच्या समीर दीक्षित आणि ह्रिषिकेश भिरंगी यांनी ‘टकाटक’च्या वितरणाची जबाबदारी सांभाळली आहे. बॉक्सऑफिसवर अगोदरच्या चित्रपटांची यशस्वी घोडदौड आणि चालू आठवडयातील प्रदर्शित चित्रपटांची संख्या पाहता ‘टकाटक’ला ४५० पेक्षा अधिक थिएटर्स तसेच आठवडयाला ६००० पेक्षा अधिक शोज् मिळणे हे वितरकांचे यशच म्हणावे लागेल. हिंदी चित्रपटांमध्ये जसे टेरिटरिजचे हक्क विकले जातात तसेच ‘टकाटक’चे निजाम (मराठवाडा) टेरिटरिजचे हक्क हे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वाच विकले गेले असल्याचे वितरक समीर दीक्षित यांनी सांगितले. मराठी चित्रपटसृष्टीत असे पहिल्यांदाच घडले असल्याचे वितरकांकडून सांगण्यात आले.

