काँग्रेस – राष्ट्रवादी पक्षाचे अनेक आमदार राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सोलापुरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून पक्षात सध्या राजीनामासत्र सुरु आहे.
पत्रकारांनी आमदारांची नावे विचारल्यास त्यांनी आमदारांची नावे सांगणे यावेळी टाळले. नावे आत्ताच सांगितली तर सगळी मजा संपेल. त्यामुळे ही नावे सध्या तरी गुपित राहू द्या, असे सांगताना येणाऱ्या आठवडयात काँग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक आमदार राजीनामा देतील हे पुन्हा एकदा त्यांनी सांगितले. येत्या काळात या नेत्यांची नावे समजतील असे सूचक विधान त्यांनी केले.
काँग्रेस पक्षाने नवीन पक्षाध्यक्ष निवडला असला तरी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाचा आत्मविश्वास खचला असून ते राजीनामा देऊन पळवाटा काढत आहेत, असा टोलाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी लगावला. तसेच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात युतीची सत्ता आणण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. राज्यातील २२७ जागांध्ये युती असून ती संख्या वाढेल पण कमी होणार नाही. निवडणुकीचा निकाल ही फक्त औपचारिकता आहे, असेही ते म्हणाले.
