सांगली महापालिकेने सज्ज ठेवलेले फिजिओथेरेपी सेंटर त्वरित सुरू करावे ; नगरसेविका ॲड. शिंदे
सांगली : महानगरपालिकेने दिव्यांग सक्षमीकरण योजनेतून तसेच सर्व शिक्षा अभियानाच्या मदतीने शाळा नंबर 6 येथे फिजीओथेरपी केंद्राची निर्मिती केली आहे. या केंद्रांमध्ये असणारी यंत्रसामुग्री अत्यंत चांगली आहे. केवळ फिजिओथेरपिस्ट नसल्यामुळे हे सेंटर बंद स्थितीत आहे.
महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या तसेच सर्व शाळेतील दिव्यांग विद्यार्थी व खेळाडूंसाठी त्याचा उपयोग होणार आहे. विशेषता अस्थिव्यंग विद्यार्थी व खेळाडूंना या फिजीओथेरपी सेंटरचा उपयोग होत असतो. या केंद्राच्या उभारणीकरिता सुमारे वीस लाख रुपये खर्च केले आहेत. पण सध्या फिजिओथेरपिस्ट नसल्याने हे सेंटर बंद ठेवण्यात आले आहे.
महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे यांनी या फिजिओथेरपी सेंटरला भेट दिली. लाखो रुपयाच्या फिजीओथेरपीची यंत्रसामग्री धूळ खात पडली आहे . त्यामुळे तातडीने याचा पाठपुरावा करून त्यांनी फिजिओथेरपिस्ट नेमण्याची मागणी महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे केली आहे.
