शिवाजी पार्क नूतनीकरणावरून राज ठाकरेंच महापालिका आयुक्तांना पत्र
मुंबई: दादर येथील शिवाजी पार्कचे नुतनीकरण करण्यावरून आता शिवसेना आणि मनसे आमने – सामने येण्याची चिन्ह दिसत आहेत. मुंबई महापालिकेकडून नुतनीकरण प्रस्तावित असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सीएसआर फंडातून नुतनीकरण करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. तर दुसरी कडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी महापालिका आयुक्तांची बैठक घेऊन हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने या प्रकल्पाची निविदा सुद्धा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क प्रकल्पात राजकारण रंगण्याची सुद्धा चिन्ह दिसत आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहिलं. शिवाजी पार्क नूतनीकरणाच्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया थांबवण्याची विनंती त्यांनी केली, दुसरीकडे लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची घाई शिवसेना आणि प्रशासन करताना दिसत आहे.
शिवतीर्थाची देखभाल करण्यास दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते. शिवाजी पार्क मैदानात जलसंचयन प्रकल्प पुन्हा सुरु करत असल्याचं आपल्याला समजलं. या प्रकल्पाला चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. तेव्हा शिवाजी पार्कमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पालिकेने पैसे खर्च करु नयेत. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता हा प्रकल्प सामाजिक बांधिलकी निधी (सीएसआर फंड) मधून राबवावा, अशी मागणी राज ठाकरेंनी पत्रातून केली.
‘आम्ही सीएसआर फंडातून शिवाजी पार्कमध्ये प्रकल्प पर्जन्य जलसंचयन राबवतो. आम्हाला प्रकल्प राबवण्याची परवानगी द्या आणि नूतनीकरण प्रकल्पासाठी सुरु असलेली निविदा प्रक्रिया थांबवा, यापूर्वी आम्ही शिवाजी पार्कवर हा प्रकल्प राबवला आहे’, अशी मागणी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली. महापालिका आयुक्त निविदा प्रक्रिया थांबवणार का? आता याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

