गावोगावी महिला देणार आर्थिक साक्षरतेचे धडे
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील उमेदच्या बचतगट महिलांना प्रशिक्षण
ग्रामीण भागातील कुटुंबामध्ये आर्थिक निरक्षरता दूर व्हावी, बँकेचे आर्थिक व्यवहार, आर्थिक बचती विषयीची माहिती व्हावी या उद्देशाने महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून उम्मेद अभियाना अंतर्गत येणाऱ्या महिला बचत गटांच्या निवडक महिलांना आर्थिक साक्षरता प्रशिक्षण देण्यात आले. आता या समूह संघटक महिला गावोगावी जाऊन आर्थिक साक्षरतेचे धडे देणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या ७२ समूह संघटक महिलांना मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रभारी ) ब. भि. नेमाने यांच्या हस्ते आर्थिक साक्षरता प्रशिक्षण संच वाटप करण्यात आला. यावेळी जीवन ग्रामीण उन्नती अभियानाचे उप संचालक प्रकाश खोपकर, बँक ऑफ महाराष्ट्राचे विभागीय मॅनेजर आर.जगनमोहन, स्टेट मिशन मॅनेजर गोपालदास झवर, ठाणे आणि पालघर लीड बँकेचे महाव्यवस्थापक जे.एन. भारती, अभय पाटील, महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्थेचे व्यवस्थापक विवेक निमकर, उम्मेद मिशन मॅनेजर महादेव कासवटे, विषय तज्ञ अलका देवरे, आर्थिक साक्षरता विभागाचे उज्वला कोकणे, सविता पावसकर, स्नेहल खंडागळे, उपस्थित होत्या.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील बचत गटांच्या महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. आता या महिला इतर बचत गटातील महिलांना तसेच गावोगाव जाऊन आर्थिक साक्षरतेचा प्रचार करणार आहेत. यामध्ये आर्थिक नियोजन, समंजस खर्च, स्मार्ट सुरेख, सुज्ञ कर्ज/उसणवारी, विमा संरक्षण आणि निवृत्ती वेतन, नवीन बँक सवयी, बँक व्यवहाराच्या चांगल्या सवयी, भारत सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजना, आदीची माहिती प्रशिक्षणार्थी महिला सांगणार आहेत.
खेळातून आर्थिक साक्षरतेचा प्रसार
गावातील लोकांना आर्थिक साक्षरतेची सहज-सुलभ माहिती व्हावी यासाठी विविध खेळ घेण्यात येणार आहेत. या खेळातून आर्थिक साक्षरतेचा प्रचार केला जाणार आहे. यासाठी सापशिडी खेळाचा वापर करण्यात येणार आहे. मनोरंजनातून साक्षरतेचे धडे यावेळी गावकर्यांना, महिला बचत गटांना गिरवता येणार आहेत.


