स्टारफिशचा शुभम पवार हा आशिया खंडातील एकमेव जलतरणपटू
ठाणेकरांकडून शुभमवर कौतुकाचा वर्षाव
ठाणे – ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनचा जलतरणपटू शुभम युवराज पवार याने नुकत्याच स्विर्त्झलंड येथे झालेल्या श्री चिन्मॉय स्विम मॉरेथॉन या जागतिक स्तरावरील स्पर्धेत 26.7 कि.मीचे सागरी अंतर 8 तास 05 मिनिटांत पार करुन जगात 7 वा क्रमांक पटकाविला असून आशिया खंडातील शुभम पवार हा एकमेव जलतरणपटू ठरला आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे ठाणेकरांकडून कौतुक होत आहे. तसेच या स्पर्धेसाठी ठाणेकरांकडून प्रोत्साहन देण्यासाठी विजय ओजाळे स्विर्त्झलंड येथे उपस्थित होते.
शुभम पवार याची या स्पर्धेसाठी निवड होताच ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी त्याला कौतुकाची थाप दिली. तसेच आमदार प्रताप सरनाईक व कोकण पदवीधर मंचचे आमदार निरंजन डावखरे, महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे यांनी देखील शुभमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शुभम पवार हा ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरण तलाव येथे नियमित सराव करीत असून महापालिकेचे प्रशिक्षक अतुल पुरंदरे व कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तो जलतरणाचे धडे घेत आहे. शुभम पवार हा वयाच्या 6 व्या वर्षापासून जलतरणाचे प्रशिक्षण घेत आहे. आजवर त्यानी राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धांमध्ये यश प्राप्त केले असून लांब पल्ल्याच्या सागरी जलतरण स्पर्धांमध्येही त्याने अनेक पारितोषिके पटकाविली आहे. नुकत्याच झालेल्या ठाणे महापौर वर्षा मॉरेथॉन स्पर्धेत शुभमला महापौर मिनाक्षी शिंदे व उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. भविष्यात त्याचा इंग्लिश खाडी पोहण्याचा मानस असून सध्या तो सराव करीत आहे.

बालेवाडी येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत स्टारफिशच्या जलतरणपटूचे यश
18 ऑगस्ट रोजी पुणे बालेवाडी येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील मॉडर्न पेंटाथलॉन बायथले या स्पर्धेत स्टारफिशच्या तीन जलतरणपटूने चमकदार कामगिरी केली. स्टारफिशचा नील वैद्य, विराट ठक्कर यांनी प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदक, आयुषी आखाडे हिने द्वितीय क्रमांक पटकावित रौप्य तर वरद कोळी यानी तृतीय क्रमांक प्राप्त करुन कांस्यपदक पटकाविले.
या सर्व जलतरण पटूंची निवड 23 ते 27 ऑक्टोबर दरम्यान अमेरिका येथील फ्लोरिडा येथे होणाऱया जागतिक जलतरण स्पर्धेसाठी झाली असून याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


