PolicePoliticsराजकारण

गृह विभागाकडून चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सातारा पोलीस अधीक्षकाची बदली : शंभुराज देसाईंच्या हट्टामुळेच बदलीची चर्चा

मुंबई: राज्य गृह विभागाने सोलापूर, सातारा, रायगड या जिल्ह्यांच्या  पोलीस अधीक्षकपदी आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील पोलीस अधीक्षक आणि उपायुक्तांच्या मोठ्या  प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या होत्या. काही ठिकाणच्या बदल्या होणे अद्यापही बाकी आहे. त्यापैकी राज्य गृह विभागाने आज काही ठिकाणच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.

प्रतीक्षाधीन असलेले अशोक दुधे यांची रायगडच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतीक्षाधीन अजयकुमार बन्सल यांची सातारा पोलीस अधिक्षकपदी, तेजस्वी सातपुते यांची पोलीस अधीक्षक, सोलापूर तर कुमार चिथा यांची सहायक पोलीस अधीक्षक/ उप- सहायक पोलीस अधीक्षक/ उप विभागीय पोलीस अधिकारी जळगाव येथे बदली करण्यात आली आहे.

सातारा पोलीस दलाची प्रतिमा उंचावणाऱ्या अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची सोलापूर ग्रामीण येथे बदली करण्यात आली. कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच सातपुते यांची बदली झाल्याने सातारकऱ्यांत नाराजी आहे. राज्यमंत्री झाल्यापासून शंभुराज देसाई यांनी तेजस्वी सातपुते यांची बदली करण्याचा हट्ट धरला होता. देसाई यांच्या हट्टामुळेच सातपुते यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याला सातारा मुकल्याची भावना व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आठ महिन्यांनी महसूल आणि पोलीस विभागातील बदल्यांचा धडाका लावला आहे.

भाजप सरकारचा माणूस हा कार्यकाल पूर्ण होण्याआधी बदली करण्यामागील निकष लावल्याची जोरदार चर्चा होती. दरम्यान, सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली करण्याची मागणी शंभुराज देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. आठ महिने होऊनही बदली होत नसल्याने देसाई यांनी याबाबत पुन्हा जोरदार फिल्डिंग लावली होती.

सातारा अधीक्षकांची बदली शंभुराज देसाई यांनी राजकीय प्रतिष्ठतेचा विषय केल्याची चर्चा आहे. सातपुते यांच्या जागी अजयकुमार बन्सल यांची नेमणूक सातारा पोलीस अधीक्षकपदी झाली. त्याचबरोबर अशोक दुधे यांची रायगड पोलीस अधीक्षकपदी नेमणूक करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button