गावाकडच्या बातम्याठाणे शहरलाईफस्टाईल

कोपरी पूलाचं काम लष्कराकडे सोपवण्याची रस्ते विकास महामंडळ मंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पूर्व द्रूतगती महामार्गावरील कोपरी पूल लष्कराकडून बांधण्यात यावा अशी मागणी रस्ते विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी ही मागणी केली आहे. पूर्व द्रूतगती महामार्गावरील कोपरी पूल जुना झाला असून तो सध्याच्या वाहतुकीसही अपुरा पडत आहे. पूर्व द्रूतगती महामार्ग हा चार पदरी असताना पूल दुपदरी असल्यामुळं पूलावरच अनेकदा वाहतूक कोंडी होते. गेली अनेक वर्ष कोपरी पूल रूंदीकरणाची चर्चा सुरू आहे. सुरूवातीस ९ कोटी रूपयांचा खर्च आता अडीचशे कोटींच्या वर गेला आहे. पण अद्यापही पूलाच्या कामाला मुहूर्त लागलेला नाही. पूलाच्या रूंदीकरणाचं काम करण्यासाठी बरीच वर्ष लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं तेवढी वर्ष वाहतूक कोंडीचा त्रास ठाणेकरांना सहन करावा लागणार आहे.

पूलाच्या रूंदीकरणाच्या कामाच्या वेळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काही पर्यायी मार्गही निर्माण केले जात असले तरी यामुळं वाहतूक कोंडी होण्याची भीती व्यक्त होत आहे. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी गेल्या महिन्यात कोपरी पूलाचं काम लष्कराकडे देण्याची मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबाबत बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं. आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत रस्ते विकास महामंडळाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोपरी पूलाचं काम लष्कराकडे देण्याची मागणी केली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button