कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज ! तयारी सुरु!
ठाणे: कल्याण -डोंबिवली महापालिका निवडणुकीची तारीख ही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या कल्याण डोंबिवली मध्ये बर्याच राजकीय उलाढाली होत आहेत. राजकीय पक्षांसोबत प्रशासनसुद्धा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. अजूनही तारीख जाहीर झाली नाही तरी पालिका प्रशासनाने १२२ प्रभागांच्या निवडणुकीसाठी काम चालू केले आहे. प्रभाग रचना, आरक्षणाची सोडत यांचा ताळेबंद बांधण्याचे काम महानगरपालिका करत आहे.
राज्यात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक नेहमीच चर्चेत राहते. शेवटच्या व्यक्तीपर्यंत पक्ष पोहोचवण्यासाठी तसेच महापालिका काबीज करण्यासाठी येथे प्रत्येक पक्ष कसोशीने प्रयत्न करतो. या निवडणुकीची तारीख अजून जाहीर झालेली नाही. मात्र, सध्या येथे निवडणुकीमुळे वातावरण गरम झाले आहे.
केडीएमसीतील १८ गावं वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयावरील खटला सध्या न्यायालयात चालू आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण होत आहे. मात्र, असे असले तरी पालिका प्रशासनानेही १२२ प्रभागाच्या निवडणुकीसाठी काम सुरु केले आहे.